स्पेनमधील बार्सिलोना शहरात गुरुवारी संध्याकाळी दहशतवाद्यांनी हल्ला केला. बार्सिलोनातील लास रॅमब्लासमध्ये एका सफेद रंगाच्या व्हॅनने पदपथावरुन चालणाऱ्या काही जणांना चिरडलं. दहशतवाद्यांनी हल्ला केल्याने घटनास्थळावरून अनेकांनी पळापळ केली. या हल्ल्यादरम्यान घडलेली एक घटना अंगावर काटा आणणारी आहे. त्यावेळी भारतीय मूळ असलेली युकेची टेलिव्हिजन अभिनेत्री लैला रुआस जवळच्या रेस्तराँमध्ये जाऊन लपली. स्वत:च्या बचावासाठी लैला रेस्तराँच्या फ्रिजरमध्ये लपून बसली होती. इतकंच नव्हे तर तिथं जे काही घडत होतं ते सर्व ती ट्विटरच्या माधम्यातून सांगत होती.

४६ वर्षांची लैला रुआस ही तिच्या १० वर्षांच्या मुलीसह बार्सिलोनामध्ये फिरायला गेली होती. हल्ल्यादरम्यान रेस्तराँमध्ये लपून तिनं ट्विट केलं की, ‘ येथे दशतवादी हल्ला सुरु असून मी रेस्तराँच्या फ्रिजरमध्ये लपले आहे. इथल्या सर्व लोकांच्या सुरक्षेसाठी प्रार्थना करतेय.’ त्यानंतर तेथे घडणारी प्रत्येक गोष्ट ती ट्विट करत होती. ‘बाहेरून बंदुकीच्या गोळ्यांच्या आवाज येतोय. पोलीस रस्त्यावर एकाचा शोध घेत आहेत,’ असं तिनं पुढे ट्विट केलं. नागरिकांच्या बचावासाठी पोलिसांचे हेलिकॉप्टरही घटनास्थळी दाखल झालं होतं. त्याचा व्हिडिओही लैलाने तिच्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला. सुदैवाने या हल्ल्यात लैला आणि रेस्तराँमधील इतर लोकही बचावले. तेथून सुरक्षित बाहेर पडताना तिनं रेस्तराँच्या कर्मचाऱ्यांचे आभार मानले. ‘आम्हाला सुरक्षित ठेवण्यासाठी रेस्तराँच्या कर्मचाऱ्यांचे खूप खूप आभार,’ असं तिनं शेवटचं ट्विट केलं.

बार्सिलोनामधील दहशतवादी हल्ल्यात १४ जणांचा मृत्यू झाला असून सुमारे १०० जण जखमी झाले आहेत. दहशतवादी संघटना ‘आयसिस’ने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. या हल्ल्यात चार संशयित दहशतवादी ठार झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
लैला ब्रिटीश टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ‘फुटबॉलर्स वाईव्स’ आणि ‘हॉल्बी सिटी’ यांसारख्या शोमध्ये ती झळकली. लैलाचे वडील मोरोक्कन असून तिची आई भारतीय आहे. १९९० च्या दरम्यान भारतात ‘व्ही’ चॅनेलवर व्हीजे म्हणून तिने तिच्या करिअरला सुरुवात केली.