क्रीडाविश्व आणि चित्रपटसृष्टीमध्ये सध्या चांगलेच सूत जुळल्याचे पाहायला मिळत आहे. हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये गेल्या बऱ्याच काळापासून खेळाडूंच्या जीवनावर बेतलेले कथानक असलेल्या चित्रपटांना प्रेक्षकांचीही मोठ्या प्रमाणावर दाद मिळत आहे. ‘भाग मिल्खा भाग’, ‘मेरिकोम’, ‘एम. एस. धोनी- द अनटोल्ड स्टोरी’, ‘दंगल’ या चित्रपटांमुळे खेळाडूंचा जीवनप्रवास प्रेक्षकांसमोर उलगडला गेला आहे. खेळाडूंच्या जीवनप्रवासावर अवलंबून असलेल्या चित्रपटांच्या या दिवसांमध्ये बास्केटबॉलपटू सतनाम सिंग भामरा यानेही त्याच्या जीवनावर एखादा चित्रपट साकारला जावा अशी इच्छा व्यक्त केली आहे. सतनामने त्याच्या भूमिकेसाठी ज्युनिअर बच्चन म्हणजे अभिनेता अभिषेक बच्चनच्या नावाला प्राधान्य दिले आहे.

‘माझ्या जीवनावर आधारित एखादा चित्रपट बनणं आणि त्यात माझा भारतापासून अमोरिकेपर्यंतचा प्रवास पाहणं हा एक सुरेख अनुभव असेल. माझी भूमिका साकारण्यासाठी माझ्या उंचीच्या अनुशंगाने अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेता अक्षय कुमार हे दोन पर्याय उत्तम ठरतील’, असे सतनाम सिंग भामरा आएएनएसला ई-मेल द्वारे दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हणाला आहे. या मुलाखतीत पुढे सतनाम म्हणाला, ‘अभिषेकची उंची आणि बास्केटबॉल या खेळाप्रती त्याची आवड पाहता तोच माझ्या भूमिकेसाठी योग्य ठरेल’. पंजाबमधील बरनाळा येथील सतमान भामरा या खेळाडूने २०१५ मध्ये क्रिडाविश्वात इतिहास रचला होता. नॅशलन बास्केटबॉल असोसिएशन म्हणजेच ‘एनबीए’मध्ये खेळणारा पहिला भारतीय बास्केटबॉलपटू ठरला होता. सतनामच्या आजवरच्या कारकिर्दीबद्दल अनेकांनाच कुतुहल वाटते आहे. त्याच्या जीवनावर आधारित ‘वन इन अ बिलियन’ हा माहितीपटही साकारण्यात आला होता.

खेळाडूसुद्धा त्यांच्या खेळातून आणि व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढत चित्रपट पाहण्यासाठी आणि मनोरंजनासाठी काही वेळ खर्ची घालतात. त्यामुळे बॉलिवूड चित्रपटांना फॉलो करतोस का? असा प्रश्न ज्यावेळी सतनामला विचारण्यात आला तेव्हा त्याने अक्षय कुमार, अभिषेक बच्चन, प्रियांका चोप्रा, दीपिका पदुकोण आणि सोनम कपूर या कलाकारांची नाव घेत रुपेरी पडद्यावर या कलाकारांचा अभिनय पाहण्यास आपल्याला अवडत असल्याचे स्पष्ट केले. त्यासोबतच सतनामने सलमान खानचे चित्रपटही चांगले असतात असेसुद्धा स्पष्ट केले.

वाचा: ऐश्वर्यासोबत काम करण्यास अभिषेकचा नकार

आता सतनामच्या जीवनावर आधारित चित्रपट बनविण्यासाठी कोणता निर्माता-दिग्दर्शक पुढे सरसावतो का? हे पाहण औत्सुक्याचे ठरणार आहे. दरम्यान, एनबीएमध्ये खेळणाऱ्या पहिल्या भारतीय खेळाडूचा मान सतनामने मिळवला असून प्रसिद्धीमाध्यमांच्या आकर्षणाचा तो केंद्रबिंदूच झाला आहे. मिळालेल्या या संधीचा पुरेपूर फायदा उचलण्यासाठी सतनाम उत्सुक आहे. पंजाबच्या बरनाळा जिल्ह्य़ातील ‘बल्लो के’ या गावात जन्मलेल्या सतनामने एनबीएमध्ये स्वत:चे स्थान निर्माण केले आहे.