चित्रपट पाहायला जाताना त्या चित्रपटाची आधी करण्यात आलेली प्रसिद्धी, चित्रपटाचा विषय, दिग्दर्शक आणि कलावंत तसेच संगीत याची माहिती घेऊनच आता प्रेक्षक चित्रपटगृहात जातो. नावाजलेल्या दिग्दर्शकाचे आधीचे चित्रपट आवडले असले तर प्रेक्षक त्याचा नवीन चित्रपट आणि लैंगिक छळणूक यांसारख्या विषयावर असेल तर आवर्जून जातो. विषयाची मांडणी विचित्र पद्धतीने करण्यात आली, गोष्टीत दम नसला तर त्याची निराशा झाल्यावाचून राहत नाही. ‘इन्कार’ चित्रपट पाहूनही प्रेक्षकाची अशीच निराशा होते. कॉपरेरेट क्षेत्रातील कार्यालयात केली जाणारी महिलांची लैंगिक छळणूक हा नाजूक विषय मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केला आहे. खरे तर हा संवेदनशील विषय कसा दाखवला जातो, याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे; परंतु विचित्र मांडणी आणि पटकथेतील कच्चे दुवे यामुळे चित्रपट कंटाळवाणा होतो. वारंवार फ्लॅशबॅकचे तंत्र आणि अस्पष्ट संवादांमुळे कंटाळा येतो.
राहुल वर्मा (अर्जुन रामपाल) आणि माया लुथरा (चित्रांगदा सिंग) हे दोघे जण एका बलाढय़ जाहिरात कंपनीतील सहकारी. जाहिरातीची तयारी, जाहिरात कॅम्पेन, त्याचे शूटिंग, जाहिरात तयार करण्याविषयीच्या विविध संकल्पना, ग्राहकांसमोर करावे लागणारे सादरीकरण, डेडलाइनचा ताण, कलात्मक पद्धतीने प्रत्येक गोष्ट करण्यासाठी सततचे ताणतणाव हे सारे नोकरीतील कामाचा अविभाज्य भाग म्हणून या दोघांना आणि जाहिरात कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या सर्वानाच स्वीकारावे लागते. राहुल आणि माया यांनी हे आव्हान पेलले आहे, म्हणूनच दोघे जण उच्च पदावर पोहोचले आहेत. एक दिवस अचानक माया अर्जुनवर लैंगिक छळणुकीचा आरोप ठेवते. कंपनी या आरोपाची छाननी करण्यासाठी, सत्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी, मिसेस कामदार (दीप्ती नवल) यांची नेमणूक करते. जाहिरात कंपनीच्याच एका आलिशान कॉन्फरन्स रूममध्ये कंपनीतील विविध सहकाऱ्यांच्या साक्षीने मिसेस कामदार चौकशीला सुरुवात करतात. मग चित्रपट उलगडताना दाखविला आहे. परंतु प्रेक्षकाला मात्र चित्रपट उलगडत जाण्याऐवजी गुंतागुंतीचा वाटून भंडावून सोडतो. अनेक गोष्टी कळतच नाहीत.
लैंगिक छळणूक केली हे सांगण्यासाठी मागील वर्षांत घडलेल्या छोटय़ा छोटय़ा घटना फ्लॅशबॅकमध्ये दाखवून माया आपला मुद्दा सिद्ध करू पाहतेय, तर त्याच घटनांचा हवाला देऊन राहुल म्हणतोय ही लैंगिक छळणूक कशी काय असू शकते. खरे तर मायाला आपल्या कंपनीत आणण्यात एवढेच नव्हे तर मायाला मुंबईच्या कॉपरेरेट जगतात कसे बोलावे, वागावे हे शिकविण्यापासून ते काम कशा पद्धतीने करावे, फक्त क्रिएटिव्हिटी असून चालत नाही, तर जाहिरात क्षेत्रात ग्राहकांसमोर सादरीकरण करून ती क्रिएटिव्हिटी कशी चांगली आणि त्यामुळे उत्पादन कसे विकले जाईल हे पटवून देण्याचे सामथ्र्य यांसारख्या अनेक गोष्टी राहुलने शिकविल्या आहेत, अनेकदा चांगले सल्ले दिले आहेत. अर्थात मायाला हे मान्यच आहे की राहुलमुळे आपले करिअर घडले आहे. परंतु करिअर घडविण्यात त्याचा हात आहे म्हणून लैंगिक छळणूक त्याने केली तर ती मला कदापि सहन होणारी नाही. राहुल हा कंपनीचा सीईओ आहे आणि त्याच्या हाताखाली काम करणारी माया अचानक कंपनीची नॅशनल क्रिएटिव्ह डायरेक्टर बनते. त्यामुळे त्यांच्यात पूर्वी असलेले प्रेम नष्ट होऊन स्पर्धा निर्माण होते. त्यात दोघांच्या अहमचा संघर्ष शिगेला पोहोचतो. म्हणून आपले पद टिकविण्यासाठी लैंगिक छळणुकीच्या आरोपाच्या चौकशीत एकमेकांसमोर उभे ठाकतात. तसे पाहिले तर दोघेही एकेकाच घटनेचा तपशील सांगून आपले म्हणणेच बरोबर आहे असे सांगू पाहतायत; परंतु त्यातून प्रेक्षक गोंधळून जातो. राहुलने लैंगिक छळणूक केली असेल हे मान्य केले तर वास्तविक दोघांमध्ये कधीकाळी प्रेम निर्माण झाले होते, मग लैंगिक छळणूक कशी? लैंगिक छळणूक केली होती की नव्हती, याचे उत्तर चित्रपटातून मिळणे अपेक्षित आहे. परंतु दिग्दर्शकाने त्याऐवजी प्रेक्षकाला गोंधळात टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
विचित्र पद्धतीचा शेवट केल्यामुळे प्रेक्षक चित्रपटगृहातून बाहेर पडतानाही गोंधळात पडलेला असतो. चित्रांगदा सिंगने साकारलेली माया अतिरंजित वाटते. काही ठिकाणी दिग्दर्शकाला लैंगिक छळणूक पुरुष करीत नाहीत असे सांगायचेय की काय असेही वाटून जाते. वास्तविक विषय इतका नाजूक आहे, समाजात त्याबद्दल समज-गैरसमज आहेत. विविध घटकांचा याबाबतचा दृष्टिकोन निरनिराळा आहे. भारतीय समाजाची मानसिकता लक्षात घेतली तर या विषयावर बोललेही जात नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे दिग्दर्शकाने अधिक सुस्पष्टपणे हा विषय मांडला असता तर त्यातून सजगता येण्याची शक्यता होती. परंतु छायालेखन आणि संगीत या दोन्हींच्या विचित्र वापरामुळे चित्रपट पाहताना प्रेक्षक गडबडतो. अनेक ठिकाणी संवाद कळत नाहीत. त्यामुळे चित्रपटाचा अर्थ लावता येत नाही. विषयच नीट पोहोचत नसल्याने कलावंतांनी केलेल्या अभिनयाबाबत बोलण्यात काहीच अर्थ नाही. एका चांगल्या विषयाची हाताळणी सततच्या फ्लॅशबॅक तंत्राने बिघडवून टाकली आहे. त्यामुळे प्रेक्षकाची निराशा होते.
टिपिंग पॉइण्ट फिल्म्स प्रस्तुत
इन्कार
निर्मिती – वायकॉम१८पिक्चर्स, लेखक-दिग्दर्शक – सुधीर मिश्रा , संगीत – शंतनु मोईत्रा, कलावंत – चित्रांगदा सिंग, अर्जुन रामपाल, दीप्ती नवल, विपिन शर्मा, कैझाद कोतवाल, गौरव द्विवेदी, संदीप सचदेव, शिवानी टांकसाळे, मोहन कपूर, रेहाना सुलतान, साईनाथ दुक्कीपती, आशीष कपूर व अन्य.