अभिनेता, दिग्दर्शक म्हणून हिंदी चित्रपटांमध्ये आपले स्थान निर्माण करताना मनोज कुमार यांनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण के ली होती. ‘भारत कुमार’ म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली कारण त्यांच्या प्रत्येक चित्रपटात देशप्रेम ओतप्रोत भरलेले असायचे. पन्नास वर्षांनंतरही ‘शहीद’, ‘रोटी, कपडा और मकान’ हे आपले चित्रपट आजच्या काळाशी सुसंगत वाटतात. कारण त्याची मांडणी तेव्हाही वास्तवाला धरूनच होती. चित्रपट हा तेव्हा व्यवसाय झाला नव्हता त्यामुळे एका ध्यासातून बनवलेले हे चित्रपट आजही तरुण पिढीला दाखवले जातात, त्यांना पहावेसे वाटतात तेव्हा खरा आनंद होतो, अशी भावना मनोज कुमार यांनी व्यक्त केली.

यावर्षी ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ हा सर्वोच्च सन्मान देऊन त्यांना गौरवण्यात आले. याच निमित्ताने मनोज कुमार यांचे चित्रपट ४७ व्या ‘इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया’ (इफ्फी)मध्ये दाखवण्यात येणार आहेत. १९६५ साली प्रदर्शित झालेला ‘शहीद’, ‘शोर’, ‘क्रांती’, ‘रोटी, कपडा और मकान’ आणि ‘गुमनाम’ असे पाच चित्रपट महोत्सवात दाखवण्यात येणार आहेत. यानिमित्ताने बोलताना दोन वर्षांपूर्वी ‘इफ्फी’साठी जाण्याचा योग आला होता, त्यावेळी आपण अभिनेता प्रेम चोप्रा यांच्यासोबत तिथे गेलो होतो. चित्रपट पाहण्यासाठी लोकांची होणारी गर्दी थक्क करणारी होती, असा आपला अनुभव मनोज कुमार यांनी सांगितला. ‘शहीद’ काय किंवा ‘रोटी, कपडा और मकान’ काय हे चित्रपट आजही प्रेक्षकांना आपलेसेच वाटणार असं ते विश्वासाने म्हणतात. त्याचे कारण हे चित्रपट रोजच्या जगण्यातून, विचारमंथनातून आलेले होते, असे त्यांनी सांगितले. ‘शहीद’ची कथाकल्पना तर शाळकरी वयापासून मनात घोळत होती. त्यामुळे त्यावर चित्रपट करण्याची संधी मिळाली तेव्हा ती लगेच घेतली, असे सांगणाऱ्या मनोज कुमार यांनी या चित्रपटाने आपल्याला तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचे प्रेम मिळवून दिले, असं  सांगितलं. त्यावेळी शास्त्रीजींनी ‘जय जवान जय किसान’चा नारा दिला होता. त्या विषयानुरूप चित्रपट बनवावा अशी त्यांची इच्छा होती आणि त्यांनी ती जबाबदारी माझ्यावर टाकली. हा विषय खूप मोठा होता. ‘भारत गावात राहतो’ असं आपण कित्येकदा म्हणतो मात्र तिथलं वास्तव दाखवणं तितकं सोपं नव्हतं. ‘उपकार’ या नावाने आलेल्या या चित्रपटात केवळ एकच विषय नव्हता. गांधीजींनीही त्यावेळी खेडय़ाकडे चला अशी हाक दिली होती. याची पाश्र्वभूमी त्या चित्रपटाला होती. कुटुंब नियोजन हा गावागावांतून महत्त्वाचा विषय होता त्यासाठी शहरात शिकल्यासवरलेल्या डॉक्टर्सनी खेडेगावात जाणं गरजेचं होतं. याचाही ऊहापोह चित्रपटात आहे. मला वाटतं, माणसाला एकच एक अडचण नसते. तो वेगवेगळ्या समस्यांमधून मार्ग काढत जगत असतो. त्यामुळे चित्रपटातून जेव्हा त्याला त्याच्या जगण्यातील या समस्या दिसतात तेव्हाच तो चित्रपट वास्तव ठरतो, असं मनोज कुमार म्हणतात.

ravi04

‘क्रांती’मध्ये देशप्रेमाविषयी बोलत असताना त्याकाळी असलेल्या राजेरजवाडे यांच्या संस्थानांचा जो माहौल होता तो चित्रपटात दिसतो. इथेही विचार करत असताना संस्थानांमधूनही सर्वसामान्य माणूस कोण असणार? देशप्रेमासाठी लढणारा क्रांतिकारी की शेतकरी असं विचाराचं द्वंद्व होतं आणि तेव्हाही शेतकरी हेच उत्तर मनात आलं होतं. ‘शोर’ हा चित्रपट तर स्वानुभवाचं बोट धरून आला होता, असं त्यांनी सांगितलं. ‘रोटी, कपडा और मकान’चा विषय आणि त्यातलं ‘हाय हाय यह मजबूरी’ या गाण्यातला प्रत्येक शब्द आजही तितकाच खरा आहे. या चित्रपटाची कल्पना अशीच वर्तमानपत्रातील बातमी वाचून सुचली होती, असं ते सांगतात. दिल्ली विद्यापीठात पदवीदान समारंभाच्या वेळी एका विद्यार्थ्यांने डिग्री हातात आल्यानंतर सगळ्यांसमोर ती फाडून टाकली होती. ही डिग्री घेऊनही नोकरी मिळणार नाही या अनुभवापायी त्याने त्या डिग्रीच्या कागदाचे तुकडे केले होते. या घटनेवरून चित्रपटाची कथाकल्पना विकसित झाली. त्या सगळ्या काळात आजूबाजूला घडणारे हे विषय माणूस म्हणून टिपत गेलो आणि एक अभिनेता-दिग्दर्शक म्हणून ते पडद्यावर आले याचं श्रेय मात्र ते त्या काळच्या निर्मात्यांना देतात. निर्मात्यांना अशा विषयात खूप रस होता. चित्रपट करणं हे त्यावेळी सर्जनशील, कल्पक काम होतं. एखाद्या ध्येयाने झपाटून काम करणं आणि व्यवसाय करणं यात जो फरक असतो तो तुम्हाला तेव्हाच्या चित्रपट निर्मितीत आणि आजच्या चित्रपट व्यवसायात दिसून येईल, इतक्या रोखठोक भाषेत त्यांनी आजच्या चित्रपटसृष्टीतलं वास्तव मांडलं. चित्रपटकर्मी हा समाजाशी बांधील असतो, तो त्या समाजाचा भाग असतो त्यामुळे त्या त्या समाजाची नीतीमूल्य, संस्कार, प्रेरणा या त्याच्या कलाकृतीतून उमटायलाच हव्यात असा आग्रह धरणारे मनोज कुमार आता या वयातही आपण पुन्हा चित्रपट करणार आहोत, असं सांगतात. व्हीलचेअरवर बसून करेन, पण चित्रपट करेन हा त्यांचा ध्यास असून पुढच्या एकोणऐंशी वर्षांच्या या तरुण दिग्दर्शकाने आपण चित्रपटाची तयारीही सुरू केली असल्याचे सांगितले.