बॉलिवूड अभिनेता इरफान खानने ‘हिंदी मीडियम’ या त्याचा आगामी सिनेमाचे नवे पोस्टर प्रदर्शित केले आहे. इरफानने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन हे पोस्टर प्रदर्शित केले आहे. या पोस्टरमध्ये दोन पाय दिसत आहेत. पण हे दोन्ही पाय मात्र पपूर्णपणे भिन्न आहेत. एका पायात महागडी पॅन्ट आणि पॉलिश केलेले बूट आहेत तर दुसऱ्या पायात फाटलेले बूट आणि जीर्ण झालेली जीन्स आहे. या पोस्टरवर एक दमदार वाक्यही लिहिले आहे. ‘खोटं बोलणे, धोका देणे, आई- वडील आपल्या मुलांना शाळेत पाठवण्यासाठी काहीही करु शकतात.’

पोस्टर आणि त्याखालच्या टॅगलाइनमुळे हे स्पष्ट होते की भारतीय शिक्षण संस्थावर हा सिनेमा भाष्य करणारा असेल. इरफानचे आतापर्यंतचे सिनेमे हे विचार करायला लावणारे असेच आहेत. त्याच्या सिनेमांतून दाखवण्यात येणारा संदेश एवढा महत्त्वपूर्ण असतो की लोकांच्या डोक्यातून तो संदेश आणि इरफानचा अभिनय जात नाही.

इरफान खानच्या ‘हिंदी मीडियम’ या सिनेमातून पाकिस्तानी अभिनेत्री सबा कमर बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. दिल्लीतील चांदनी चौक परिसरात राहणाऱ्या एका मध्यमवर्गीय जोडप्याची उच्चभ्रू समाजात राहण्यासाठीची तगमग आणि त्यासाठी केलेल्या प्रयत्नांवर आधारित कथानक या सिनेमाद्वारे साकारण्यात आले आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन साकेत चौधरी यांनी केले आहे. नेहमीच काही गंभीर भूमिका साकारणारा अभिनेता इरफान खान या सिनेमात एका नव्या भूमिकेत दिसेल.

रोमॅण्टिक कॉमेडी प्रकारात मोडणाऱ्या या सिनेमाचे सर्वाधिक चित्रिकरण दिल्लीमध्येच करण्यात आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा एका नव्या नजरेतून दिल्लीची झलक पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. सबाने याआधीही काही सिनेमात आणि मालिकांमध्ये काम केले आहे. पण, पाकिस्तानी कलाकारांचे भारतातील सध्याचे वातावरण पाहता आता या सिनेमाचे भवितव्य काय असणार याबद्दलच्या चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे. ३१ मार्चला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

इरफानने पहिल्यांदा २००५ मध्ये आलेल्या ‘रोग’ या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. त्यानंतर ‘हासिल’ या सिनेमासाठी इरफानला त्यावर्षीचा सर्वोत्कृष्ट खलनायकाचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता. त्यानंतर इरफानने ‘लंचबॉक्स’, ‘गुंडे’, ‘हैदर’, ‘पिकू’ आणि ‘ज्युरासिक वर्ल्ड’ यांसारख्या सिनेमात काम केले आहे. इरफान खानला ‘पान सिंग तोमर’ या सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. तसेच २०११ मध्ये भारत सरकारच्या वतीने ‘पद्मश्री’ पुरस्कारानेही गौरवण्यात आले होते.