दीपिका पादुकोन आणि रणवीर सिंग यांच्यामध्ये दुरावा आल्याचे वृत्त सध्या येत आहे. दोघांचे लवकरच ब्रेकअप होण्याच्या चर्चाही सध्या जोरदार सुरु आहेत. दीपिका आणि रणवीर यांच्या ब्रेकअपचं कारण शाहिद कपूर असल्याचं म्हटलं जात आहे. शाहिद सध्या संजय लीला भन्सालीच्या ‘पद्मावती’मध्ये दीपिकाच्या नवऱ्याची भूमिका साकारत आहे.

पण असे कधीही ऐकू आले नाही की शाहिद आणि दीपिका हे फार चांगले मित्र आहेत. या दोघांनी याआधी कधीही एकत्र काम केले नाही. पण तुम्हाला वाचून धक्का बसेल की, ‘पद्मावती’ सिनेमासाठी शाहिदच्या नावाची शिफारस ही खुद्द दीपिकाने केली होती. दीपिकाने शाहिदचे नाव सुचवले हे रणवीरला अजिबात रुचले नाही.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘पद्मावती’ सिनेमात दीपिका रणवीरपेक्षा शाहिदसोबत जास्त वेळ दिसण्यात येणार आहे. याशिवाय या सिनेमात शाहिद आणि दीपिका यांच्यात जवळीक दाखवणारी दृश्यही चित्रित केली जाणार आहे. त्यामुळे या संपूर्ण सिनेमाच्या कथेवर रणवीर फारसा खुश असल्याचे दिसत नाही.

काही दिवसांपूर्वी अशीही बातमी येत होती की, ‘पद्मावती’ सिनेमाच्या पहिल्या पोस्टरमध्ये शाहिद असावा असेही रणवीरला वाटत नव्हते. पण दीपिकाने स्वतःनेच पहिल्या पोस्टरमध्ये शाहिद असावा अशी मागणी भन्साली यांच्याकडे केली होती. दीपिकाला पहिल्या पोस्टरमध्ये फक्त स्वतःला आणि शाहिदला बघायचे आहे. रणवीर पोस्टरमध्ये नसावा हा तिचा निर्णय असल्याची चर्चा सुरु होती.

दीपिकाने नुकताच तिचा पहिला हॉलिवूड सिनेमा ‘ट्रिपल एक्स’चा ट्रेलर प्रदर्शित केला होता. या ट्रेलरमधल्या दीपिकाच्या कामाचे शाहिदने सोशल मीडियावर भरभरून कौतुक केले होते. शाहिदच्या मेसेजला उत्तर देताना दीपिकाने इमोजी स्माइलचा वापर केला. त्यामुळे दीपिका आणि शाहिदमध्ये आता नवी मैत्री खुलते आहे का असा प्रश्न आता अनेकांच्या मनात येत आहे.