सेलिब्रेटी म्हटलं की त्या व्यक्तीवर बोलण्यात, वागण्यात काही बंधन येतात. आपण एखादं वक्तव्य केल्यानंतर त्याचे काही उलट परिणाम तर होणार नाही ना.. अशा दडपणाखाली सेलिब्रेटी मंडळी ब-याचदा वावरत असतात. असे फार कमीच सेलिब्रेटी असतात जे निडरपणे व्यक्त होतात. बॉलीवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप याच्या व्यक्तिमत्त्वातील असाच एक पैलू नेहा धुपियाच्या ‘नो फिल्टर नेहा’ या शोमध्ये दिसून आला. या शोमध्ये त्याने आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल भाष्य केले.

‘नो फिल्टर नेहा’ या शोमध्ये अभिनेत्री आणि सूत्रसंचालक नेहा धुपियाने अनुरागला त्याच्या ‘लव्ह लाइफ’बद्दल प्रश्न केला. त्यावर अनुराग म्हणाला की, मी सर्वात वाईट आहे. बहुदा मी प्रेमीसंबंधांमध्ये एखाद्या गैरहजर व्यक्तीप्रमाणे राहिलो आणि याची प्रचिती मला अयशस्वी नात्यांतून आली आहे. मी आणि कल्कीने जेव्हा विभक्त होण्याचा निर्णय घेतला तेव्हा कल्की म्हणालेली की,  तुझी बायको बनून राहण्यापेक्षी मी तुझी शेजारीण बनून राहणे केव्हाही चांगले असेल. तू ज्याप्रकारे चित्रपटांचे दिग्दर्शन करतोस त्याप्रकारे तुझी सेक्स लाइफही होती का? असा प्रश्न विचारण्यात आला असता ‘त्याहूनही उत्तम’ असे अनुरागने उत्तर दिले. पुढे अनुराग सांगतो की, प्रेमसंबंधाबाबत बोलण्याची कधी वेळ आलीच तर मी तुमचा सर्वात शेवटी विचार करेन असे माझ्या मुलीचे आलियाचे म्हणणे आहे.

अनुराग हा विशेषतः भडक आशयाच्या चित्रपटांसाठी ओळखला जातो. त्याने ‘गँग्स ऑफ वसेपूर’, ‘देव डी’, ‘दॅट गर्ल इन यल्लो बूट्स’ या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. त्याने आता शेवटचा दिग्दर्शित केलेला चित्रपट म्हणजे ‘रमण राघव २.०’ . या चित्रपटातील नवाजुद्दीन सिद्दीकी आणि विकी कौशल यांच्या भूमिकांना नावाजण्यात आले होते. तर, सेन्सॉरच्या कचाट्यात सापडलेल्या त्याची निर्मिती असलेल्या ‘उडता पंजाब’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. भारतातील पंजाब या राज्यात अमली पदार्थांच्या विळख्यात सापडलेल्या तरुणाईवर हा चित्रपट आधारित होता. या चित्रपटात शाहिद कपूर, करिना कपूर खान, आलिया भट्ट, दिलजीत दोसांज यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. लवकरच त्याच्या निर्मिती अंतर्गत ‘भावेश जोशी’ आणि ‘घुमकेतू’ हे दोन चित्रपट येणार आहेत.