अपूर्वा लाखियाच्या दिग्दर्शनात बनणारा ‘हसीना- द क्वीन ऑफ मुंबई’ या सिनेमाचे चित्रिकरण आता संपले आहे. मुंबईत ४५ दिवसांच्या चित्रिकरणानंतर नुकतेच या सिनेमाचे ‘पॅकअप’ करण्यात आले. श्रद्धा कपूर यात हसीनाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. या सिनेमाची कथा कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमची बहिण हसीना पारकरच्या आयुष्यावर बेतलेली आहे. सिनेमात श्रद्धा फारच निडर दाखवण्यात आली आहे. तीन वर्षांपूर्वी म्हणजे ६ जुलै २०१४ ला हसीनाचा मृत्यू झाला होता. हसीनाविरोधात ८८ खटले दाखल करण्यात आले होते, पण तिच्या आयुष्यात ती फक्त एकदाच कोर्टात गेली होती. असे म्हटले जाते की, हसीना तिच्या भावाचा म्हणजे दाऊदचा सुमारे १००० कोटींचा अवैध धंदा सांभाळायची. या सिनेमात दाऊदची भूमिका श्रद्धाचा सख्खा भाऊ सिद्धांत कपूर साकारत आहे.

भारतीय सिनेसृष्टीत असे पहिल्यांदा होणार आहे की, पडद्यावर सख्या बहिण भावांची व्यक्तिरेखा ही खऱ्या आयुष्यातले बहिण भाऊ साकारणार आहेत. या सिनेमात १७ ते ५५ इतक्या वर्षांचा हसीनाचा कालावधी दाखवण्यात येणार आहे. श्रद्धा या सिनेमात ४ वेगवेगळ्या लूकमध्ये दिसेल. तिच्या प्रत्येक लूकसाठी फार मेहनत घेण्यात आली आहे. हसीना पारकरला डोळ्यांसमोर ठेवून तिच्यासाठी खास कपडे शिवण्यात आले आहेत. येत्या १४ जुलैला ‘हसीना’ सिनेमा सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

‘हसीना’ सिनेमानंतर श्रद्धा, अर्जुन कपूरसोबत मोहित सुरी दिग्दर्शित ‘हाफ गर्लफ्रेण्ड’ या सिनेमातही दिसणार आहे. ‘हाफ गर्लफ्रेण्ड’ सिनेमातून अर्जुन आणि श्रद्धा पहिल्यांदा एकत्र काम करत आहेत. या सिनेमात अर्जुन, माधव झा तर श्रद्धा रीया सोमानीची व्यक्तिरेखा साकारणार आहे.