चित्रपटसृष्टीत असे फार कमी दिग्दर्शक आहेत, ज्यांचा वावरही प्रेक्षकांची मनं जिंकून जातो असाच एक दिग्दर्शक म्हणजे इम्तियाज अली. ‘जब वी मेट’, ‘रॉकस्टार’ या चित्रपटांतून इम्तियाजच्या दिग्दर्शनाची अनोखी बाजू सर्वांनीच पाहिली. किंबहुना त्याचे चित्रपट म्हणजे एक प्रकारचा प्रवासच असतो असं म्हणायला हरकत नाही. कारण विविध ठिकाणं आणि त्या ठिकाणच्या संस्कृतीचंही दर्शन त्याच्या चित्रपटांमधून होतं. ही झाली इम्तियाजच्या दिग्दर्शनाची बाजू. तसं पाहिलं तर हा दिग्दर्शक सहसा कोणत्याही वादात अडकत नाही. पण, नुकत्याच पार पडलेल्या एका कार्यक्रमात त्याचा पारा चढल्याचं पाहायला मिळालं.

नुकतंच ‘जब हॅरी मेट सेजल’ या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्याच्या वेळी इम्तियाज आणि अभिनेत्री अनुष्का शर्माने हजेरी लावली होती. या कार्यक्रमाला एसआरके म्हणजेच शारुख खानने थेट लॉस एन्जलिसवरुन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजेरी लावली होती. सर्वकाही सुरळीत सुरु होते, माध्यमांच्या प्रतिनिधींच्या प्रश्नांची उत्तरंही दिली जात होती. पण, त्याचवेळी एक असा प्रश्न विचारण्यात आला ज्यावर इम्तियाजचा पारा चढला. एका महिला पत्रकाराने हा प्रश्न विचारताच नेहमी शांत राहणाऱ्या इम्तियाजचं कधीही न पाहिलेलं रुप सर्वांनी पाहिलं. आयफा पुरस्कार सोहळ्यादरम्यान झालेल्या घराणेशाहीच्या मुद्द्यावरुन इम्तियाजला एक प्रश्न विचारण्यात आला. पण, हा प्रश्न विचारताच त्याने पत्रकाराला खडसावलं.

‘प्लॅनेट बॉलिवूड’च्या व्हिडिओमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार इम्तियाजने याआधीच या प्रश्नाचं उत्तर दिलं होतं. या प्रश्नाचं उत्तर देत आपण या चित्रपटसृष्टीत कधीही घराणेशाहीचा सामना केला नाहीये हे स्पष्ट केलं होतं. ‘आम्ही तिघंही (शाहरुख, अनुष्का आणि मी) इंडस्ट्रीतील नव्हतोच. आमच्यासोबत असं काही झालं असतं तर आज आम्ही इथे नसतोच. मी आज या ठिकाणी असण्याचं श्रेय सर्वस्वी या चित्रपटसृष्टीलाच जातं. या चित्रपटसृष्टीनेच मला प्रोत्साहित केलं आहे. त्यामुळे निदान मी तरी अशी कोणतीच गोष्ट या ठिकाणी पाहिली किंवा अनुभवली नाहीये’, असं इम्तियाजने स्पष्ट केलं होतं.

वाचा : ….म्हणून राजेश खन्ना यांनी बदलली होती त्यांच्या वरातीची वाट

‘जब हॅरी मेट सेजल’च्या या दिग्दर्शकाने उत्तर दिल्यानंतरही त्याला घराणेशाहीच्याच मुद्द्याला अनुसरुन आणखी एक प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा मात्र त्याचा राग अनावर झाला. ‘हे पाहा मी तुमचं ऐकून घेतोय. तुम्ही तर असा प्रश्न विचारत आहात की ती गोष्ट (घराणेशाही) नेहमीच होत असते. हा तुमचा समज आहे. जर असं काहीही चित्रपटसृष्टीत घडलं असतं तर सहाजीकच ते चुकीचं असतं’, असं त्याने ठामपणे सांगितलं. इम्तियाजने असं पहिल्यांदाच कोणा एका पत्रकारावर आवाज चढवला असावा. आपली चूक झाल्याचं जेव्हा त्याच्या लक्षात आलं तेव्हा लगेचच सर्वांसमोर त्याने त्या पत्रकार महिलेची माफी मागितली.