अगदी प्रदर्शनासाठी आठवडा शिल्लक असताना इम्तियाज अली दिग्दर्शित ‘जब हॅरी मेट सेजल’ चित्रपटातील ‘हवाए’ हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलंय. सध्या या चित्रपटाची सर्वच गाणी अनेकांच्याच प्ले लिस्टचा भाग झाल्याचं पाहायला मिळतंय. प्रदर्शनापूर्वीच चित्रपटाच्या गाण्यांनी प्रेक्षकांवर जादू केलीये. त्यातच प्रितमने संगीतबद्ध केलेलं आणि अरिजित सिंगच्या आवाजातील ‘हवाए’ या गाण्याला अवघ्या २४ तासांच्या आतच खूप प्रसिद्धी मिळाली.

या गाण्याने केवळ प्रेक्षकांवरच नाहीत तर किंग खान आणि अनुष्का शर्मा यांच्यावरही भुरळ घातली आहे. गाण्याला मिळत असलेल्या प्रचंड प्रतिसादामुळे अत्यंत आनंदी असलेल्या अनुष्काने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केलाय आणि हा व्हिडिओ स्वत: शाहरूख खानने शूट केलाय. अनुष्काच्या या स्लो मोशन व्हिडिओमध्ये ती आनंदाने गोल फिरताना दिसतेय. तिच्या चेहऱ्यावरील आनंद आणि हास्य यातून सहज पाहायला मिळतेय.

वाचा : बांदेकरांची ‘होम मिनिस्टर’ २० वर्षांनंतर रंगभूमीवर

किंग खाननेही ट्विटरच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांचे आभार मानले. ‘तुम्ही दिलेल्या प्रेमासाठी धन्यवाद, हवाए गाणं ऐकत राहा आणि असंच प्रेमाचा वर्षाव करत राहा,’ असं ट्विट शाहरूखने केलंय. एका वेगळ्याच दुनियेत नेणारा अरिजितचा आवाज आणि स्क्रीनवर शाहरुख, अनुष्काची केमिस्ट्री या गाण्याला ‘चार चाँद’ लावत आहेत. मुख्य म्हणजे हे गाणं पाहताना शाहरुखने आतापर्यंत साकारलेल्या ‘राहुल’, ‘राज’ या बऱ्याच भूमिकांची आठवण होते.