टेलिव्हिजन विश्वात विविध विनोदी कार्यक्रमांमध्ये जात आजवर अनेक चित्रपटांनी त्यांची प्रसिद्धी केली आहे. चित्रपटातील काही कलाकारांच्या उपस्थितीत त्यांच्यावर किंवा इतर विषयांवर विडंबनपर विनोद करत हे विनोदवीर उपस्थितांचे मनोरंजन करत असतात. पण कधीकधी विनोदाची मर्यादा अपेक्षेपलीकडे गेल्यामुळे अनेक कलाकारांनी काही विनोदवीरांवर नाराजी व्यक्त केली आहे.
विनोदी कार्यक्रमांवर आणि विनोदी कलाकारंवर नाराजी व्यक्त करणाऱ्या कलाकारांमध्ये आता अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीसचीही भर पडली आहे. कृष्णा अभिषेक आणि भारती सिंग यांच्या ‘कॉमेडी नाइट्स बचाओ’ या कार्यक्रमामध्ये ‘ढिशूम’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी जाण्यास जॅकलीनने नकार दिल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. कार्यक्रमात होणारे बाजगळ आणि कोणताही संदर्भ नसणाऱ्या विनोदांमुळे दिवसेंदिवस या कार्यक्रमाची लोकप्रियता कमी होत आहे. यापूर्वीही या कार्यक्रमात केल्या जाणाऱ्या विनोदांवर आणि कलाकारांवर अभिनेता अक्षय कुमार, हृतिक रोशन यांनीही नाराजी व्यक्त केल्याचे वृत्त सूत्रांमार्फत मिळत आहे. ‘हाऊसफुल्ल ३’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी कार्यक्रमात आलेल्या या टीममधील अभिनेत्री लिसा हेडन हिच्यावर काही आक्षेपार्ह विनोद केल्यामुळे खिलाडी कुमारने यावर नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे ‘कॉमेडी नाइट्स बचाओ’मध्ये जाउन अपमानास्पद विनोदांचा सामना करण्यापेक्षा अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीस हिने कार्यक्रमात जाण्यास स्पष्ट नकार दिला आहे. मराठीच्या ‘चला हवा येऊद्या’ मध्ये एकच धम्माल उडवत आगामी ‘ढिशूम’ या चित्रपटाची झालेली प्रसिद्धी ‘कॉमेडी नाइट्स बचाओ’मध्ये तुर्तास पाहायला मिळणार नाही अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. ‘ढिशूम’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र प्रसिद्धी सुरु असून अभिनेता वरुण धवन, जॉन अब्राहम आणि जॅकलीन फर्नांडिस हे या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत आहेत. असा हा बहुप्रतिक्षित ‘ढिशूम’ २९ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.