‘जग्गा जासूस’ चित्रपटाच्या प्रमोशननंतर कतरिना आता तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त झाली आहे. ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटात सलमान खानसोबत ती भूमिका साकारताना दिसणार आहे. सध्या मोरोक्कोमध्ये चित्रपटाचे शूटिंग सुरू असून कतरिना फावल्या वेळात काही नवनवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न करतेय. मोरोक्कोतील समुद्रात कतरिनाने सर्फिंग केली असून त्याचा एक व्हिडिओ तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलाय. ‘एसेवारामध्ये पहिल्यांदाच सर्फिंग करतेय,’ असं कॅप्शन कतरिनाने या व्हिडिओला दिलंय.

चित्रपटांमध्ये कतरिना अनेकदा साहसदृष्ये करताना दिसते. हा व्हिडिओ पाहून रिअल लाईफमध्येही ती तितकीच साहसी असल्याचं म्हणायला हरकत नाही. दिग्दर्शक अली अब्बास जफरने नुकताच सलमान खानचा एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये तो मोरोक्कोमध्ये घोडेस्वारी शिकत असल्याचे पाहायला मिळाले. न्यूयॉर्कमध्ये आयफा पुरस्कार सोहळ्यानंतर कतरिना आणि सलमान थेट मोरोक्कोला गेले. ऑस्ट्रियामध्येही चित्रपटाच्या काही भागाचे शूटिंग झाले.

वाचा : शाहरूखचे हे ७ ‘वीक पॉईंट’ तुम्हाला माहित आहेत का?

कतरिना आणि सलमान या चित्रपटातील बहुतेक साहसदृष्ये स्वत: करणार आहेत. यासाठीच दोघेही खूप मेहनत घेताना दिसत आहेत. नवनवीन गोष्टी शिकण्याचा दोघांचाही प्रयत्न सुरू आहे. चित्रपटातील भूमिकेसाठी सलमानने १७ किलो वजन कमी केल्याचेही म्हटले जातेय.

वाचा : ‘…तर मी शेतकरी झाले असते,’ कंगनाचं सैफला प्रत्युत्तर

दरम्यान कतरिना आणि रणबीरच्या ‘जग्गा जासूस’ चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर संमिश्र प्रतिसाद मिळाला. तर दुसरीकडे सलमानच्या ‘ट्युबलाइट’ चित्रपटाला थंड प्रतिसाद मिळाला. ‘टायगर जिंदा है’च्या निमित्ताने चार वर्षांनंतर सलमान आणि कतरिनाची जोडी पडद्यावर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. याआधी २०१२ मध्ये ‘एक था टायगर’मध्ये दोघांनी एकत्र काम केलं होतं.