‘आपण सुपरस्टार राजेश खन्ना आहोत’ हे त्याच्यात भिनले तेव्हापासून त्याने जणू जे जे काही करायचे ते राजेश खन्नाला, त्याच्या प्रतिमा-लोकप्रियता यांना साजेसेच करायचे असा त्याने जणू चंगच बांधला.

‘त्याच्यात’ म्हणजे खुद्द राजेश खन्नात! १९८८ च्या ८ जानेवारीला ‘राजेश खन्ना प्रॉडक्शन्स’च्या ‘जय शिव शंकर’ चित्रपटाच्या मुहूर्ताच्या क्षणी हे सगळंच प्रकर्षांने अनुभवायला मिळाले.

तो व त्याची पत्नी डिम्पल या चित्रपटाच्या निमित्ताने ‘नायक’ व ‘नायिका’ म्हणून एकत्र आले हा काही साधा क्षण नव्हता. राजेश खन्नाच्या ‘फिल्मी वर्तुळा’तील वातावरणात काही साधे घडेलच कसे म्हणा.

बरं, हे ‘पती-पत्नी’चेही एकत्र येणे होते.

‘सागर’पासून (म्हणजे ऑगस्ट १९८५) डिम्पलने पुन्हा अभिनयाला सुरुवात केली आणि आपली गुणवत्ता, सौंदर्य, मेहनतीची तयारी व व्यावसायिक निष्ठा या गुणांवर तिने आपले स्थान व अस्तित्व निर्माण केले. हा प्रवास म्हणजे तिने ‘पती’ राजेशपासून वेगळे होत स्वतंत्र शैलीने केलेला होता.

म्हणून काय चित्रपटासाठी एकत्र यायचे नाही काय? व्यक्तिगत नाती व व्यावसायिक गणिते याची सरमिसळ हे तर चित्रपटाच्या जगाचे वैशिष्टय़. चित्रपट रसिकांनाही ही ‘बॉबी गर्ल’ (पूर्वीची का?) व हा ‘सुपरस्टार’ (तोदेखील एकेकाळचा का?) एकत्र यावेत असे वाटत होतेच..अखेर तो सोनेरी क्षणाचा दिवस उजाडला.

चित्रनगरीतील देवळाच्या कायमस्वरूपी सेटवर डिम्पल अगोदर पोहोचली व राजेश सवयीने उशिरा आला, हेदेखील अपेक्षित होते. दोघांत सर्वप्रथम कोण ‘हॅलो’ म्हणतोय यावर उपस्थितांचे लक्ष. (तेव्हा हे असे ‘भरल्या सेटवर’ काय काय घडतंय याच्या छोटय़ा छोटय़ा गोष्टीदेखील बातम्या बनत) राजेश खन्ना निर्मात्याच्या भूमिकेतून तिथे उपस्थित प्रत्येक सिनेपत्रकाराला व्यक्तिश: भेटला. अन्यथा अभिनेता म्हणून तो व्यवस्थित अंतर ठेवण्यात हुशार.

डिम्पलने सर्वप्रथम त्याला (म्हणजे पतीला की निर्मात्याला की सहकाऱ्याला?) हास्य व नजरेने विचारले.. दोघांच्या देहबोलीत ‘आपण एकत्र चित्रपट करतोय’ याचा आनंद जाणवला.

एस. ए. चंद्रशेखर दिग्दर्शित या चित्रपटातील जीतेंद्र, पूनम धिल्लाँ, चंकी पांडे, संगीता बिजलानी आदींचे आगमन झाले तरी सगळ्यांच्या नजरा राजेश खन्ना व डिम्पलवरच खिळल्या होत्या. कारण कुचाळक्यांनी भरलेल्या सिने प्रसारमाध्यमांनी त्यांच्या संसारातील भांडणांवर अशा काही कथा-दंतकथा-अफवा पिकवल्या की हे दोघे बहुधा कधीच एकमेकांकडे पाहणारदेखील नाहीत असे वाटले.

मुहूर्त म्हणजे बाकीचे फिल्मवाले गळामिठी देत-घेत शुभेच्छा द्यायला असायचेच. त्यात आवर्जून नाव घ्यावे विजय आनंदचे! त्याच्या ‘रजपूत’मध्ये राजेश खन्नाने काम केले होते.