जलिकट्टूवरील बंदी उठवण्याच्या मागणीसाठी तामिळनाडूमध्ये जोरदार निदर्शने सुरू आहेत. आता आंतरराष्ट्रीय ख्यातीचा संगीतकार ए. आर. रेहमाननेही जलिकट्टूला पाठिंबा दर्शवला आहे. जलिकट्टूच्या समर्थनार्थ आंदोलन करणाऱ्यांच्या पाठिशी तो ठामपणे उभा राहिला असून, उद्या, शुक्रवारी तो लाक्षणिक उपोषणाला बसणार आहे.

जलिकट्टूवरील (बैलांच्या शर्यती) बंदी उठविण्याच्या मागणीसाठी तामिळनाडूमध्ये सध्या तीव्र आंदोलन सुरू आहेत. चेन्नईतील मरिना बीचवर काल, हजारोंच्या संख्येने लोक जमले होते. जलिकट्टूच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरलेल्या जनसमुदाय पाहता पोलिसांनी खबरदारी म्हणून मोठा फौजफाटाही तैनात केला होता. तामिळनाडूमधील प्रसिद्ध जलिकट्टू या खेळावरील बंदी उठवण्यात यावी, या मागणीला दाक्षिणात्य अभिनेते कमल हसन, सुपरस्टार रजनीकांत, धनुष आदी कलाकारांसह आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनीही पाठिंबा दिला होता. त्यांनीही आंदोलकांच्या या मागणीचे समर्थन केले आहे.

आता संगीतकार ए.आर. रेहमाननेही आंदोलकांच्या सूरात सूर मिसळला आहे. जलिकट्टूसाठी आंदोलन करणाऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आपण शुक्रवारी उपोषण करणार असल्याची माहिती त्याने दिली आहे. रेहमानने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन आपण उपोषण करणार असल्याचे म्हटले आहे. तामिळनाडूच्या जनतेच्या ज्या भावना आहेत, त्यांच्या समर्थनासाठी मी उपोषण करणार आहे, असे त्याने ट्विटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, पोंगल सणाच्या दिवशी जल्लीकट्टू हा खेळ खेळला जातो. काही दिवसांपूर्वी झालेल्या पोंगल सणाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी पोलिसांनी राज्यभरात कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. जलीकट्टूला सर्वोच्च न्यायालयाने परवानगी नाकारल्याने तामिळनाडूमध्ये जागोजागी निषेध नोंदवला गेला होता.

मदुराई, दिंडिगूल आणि तंजावूर जिल्ह्यात आंदोलने करण्यात आली होती. पोंगल उत्सवादरम्यान आंदोलकांनी काळे झेंडे दाखवून आपला निषेध व्यक्त केला होता. मदुराई जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये निषेध म्हणून काही ठिकाणी दुकाने बंद ठेवण्यात आली होती. जलीकट्टू या खेळाला सुमारे २,००० वर्षांची परंपरा आहे.

बैलाच्या शिंगाला पैसे बांधून त्या बैलाला पळवले जाते. जी व्यक्ती पळणाऱ्या बैलाच्या शिंगावरुन पैसे काढेल ती व्यक्ती विजयी ठरवली जाते. या खेळामध्ये बैलांवर अत्याचार होतो तसेच आतापर्यंत अनेक जण या खेळामध्ये जखमी झाले आहेत म्हणून सर्वोच्च न्यायालयाने या खेळावर बंदी घातली होती. या खेळाला परवानगी देण्यात यावी असे म्हणत अण्णा द्रमुक पक्षाच्या महासचिव शशिकला यांनी केंद्र सरकारने प्रयत्न करावेत असे म्हटले होते. न्यायालयाने जे आदेश दिले त्यानुसार केंद्र सरकार या खेळाबाबत निर्णय घेईल असे म्हटले होते.