स्त्री सेलेब्रिटींच्या दिगंबर छायाचित्रांद्वारे कलात्मकतेची एक वेगळी परिभाषा मांडत अमेरिकेच्या पारंपरिक व सांस्कृतिक विचारसरणीची दिशा बदलणाऱ्या ह्य़ु हेफनर यांचे नुकतेच वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झाले. साहित्य, संगीत, समाज आणि राजकारणातील विकृत मनोवृत्तींवर आपल्या धारदार लेखणीने तिरकस वार करणाऱ्या या ध्येयवेडय़ा माणसाची यशोगाथा सांगणारा चरित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दिग्दर्शक ब्रेट रेटनर यांनी या चित्रपटाची घोषणा केली असून ऑस्कर पुरस्कार विजेता जेरेड लेटो हा हेफनर यांच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ललनांच्या गराडय़ात वावरणाऱ्या हेफनर यांच्या अनैतिक संबंधांच्या चर्चा नाक्यानाक्यांवर होत असत, त्यांची समृद्ध जीवनशैली माध्यमांसाठी बातम्यांचा विषय होती. त्यांचे नाव जगातील गर्भश्रीमंताच्या यादीत झळकत होते. पण या डोळे दिपवणाऱ्या साम्राज्यामागचा प्रचंड मोठा संघर्ष हळूहळू नजरेआड होत गेला. ब्रेट यांना तो संघर्षमय प्रवास चित्रपटातून प्रेक्षकांसमोर मांडण्याची इच्छा आहे. त्यांच्या मते समाजाने हेफनरला एका विशिष्ट चौकटीतून पाहिले. त्यांची जिद्द, चिकाटी आणि महत्त्वकांक्षा तरुणांना प्रोत्साहित करणारी आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलूंची ओळख समाजाला व्हावी या उद्दात्त हेतूने चित्रपटाची निर्मिती केली जाणार असल्याचे रेटनर यांनी सांगितले. याआधी २००८ साली रेटनर यांनी हेफनर यांच्या आयुष्यावर चरित्रपट तयार करण्याची घोषणा केली होती; पण त्या वेळी काही तांत्रिक अडचणींमुळे त्यांना ते शक्य झाले नव्हते. परंतु या वेळी ते आपल्या निर्णयावर ठाम आहेत.