‘जस्सी जैसी कोई नही’ मालिकेतून छोटय़ा पडद्यावर पदार्पण केलेली अभिनेत्री मोना सिंग टेलिव्हिजन इंडस्ट्रीत चांगलीच लोकप्रिय आहे. काही ठरावीक गॅपनंतर मोना मालिकेतून तिच्या चाहत्यांसमोर येते. पण, ती येते तेव्हा त्या प्रत्येक मालिकेची चर्चाही होते हेही तितकेच खरे आहे. मोनाने मालिका आणि रिअ‍ॅलिटी शोजचे सूत्रसंचलन अशा दोन्ही गोष्टींचा समतोल साधत आजवरची वाटचाल केली आहे. एकता कपूरची लाडकी असलेली मोना पुन्हा तिच्याच मालिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहे. ‘प्यार को हो जाने दो’ असे या मालिकेचे नाव असून यात मोनाची जोडी अभिनेता इक्बाल खानबरोबर जमली आहे.
‘प्यार को हो जाने दो’ मालिके चे प्रोमोज सध्या सोनी टीव्हीवर झळकले आहेत. याआधी दोन वर्षांपूर्वी सोनी टीव्हीवरच एकता कपूरच्या ‘क्या हुआ तेरा वादा’ या मालिकेतून मोनाने मुख्य भूमिका के ली होती. ‘पती, पत्नी और वो’ या नेहमीच्या पठडेबाज शैलीतील या मालिकेतही मोनाचेच पारडे जड होते. त्या मालिकेनंतर मध्यंतरीच्या काळात तिने ‘एंटरटेन्मेंट के लिए कुछ भी करेगा’ या शोसाठी सूत्रसंचालनही केले आणि ‘झेड प्लस’ हा चित्रपटही केला. खरेतर, त्याच वेळी मोनाला घेऊन आपण पुन्हा एक नवीन मालिका करणार असल्याची घोषणा एकता कपूरने केली होती. आता या मालिकेच्या निमित्ताने केवळ मोनाच नव्हे तर एकताने आपल्या आणखी एका आवडत्या कलाकारालाही पुन्हा छोटय़ा पडद्यावर आणले आहे. एकेकाळी मोठय़ा पडद्यावर हिरो म्हणून बस्तान मांडण्याचा प्रयत्न करून पाहिलेल्या इक्बाल खानला छोटय़ा पडद्यावर मालिकांमधूनच लोकप्रियता मिळाली आहे. गेल्या वर्षी ‘तुम्हारी पाखी’ मालिकेतून काम केलेला इक्बाल पहिल्यांदाच मोनाबरोबर एकत्र काम करणार आहे.
मोना आणि इक्बालची जोडी पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र येत असल्याने लोकांमध्ये या मालिकेबद्दल उत्सुकता आहे. मात्र, एकता कपूरच्या नेहमीच्या ‘अंध’श्रद्धेमुळे मोनाची ही नवीन मालिका आठवडय़ाभराने पुढे ढकलली गेली आहे. ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवडय़ात ही मालिका सोनी टीव्हीवर दाखवण्यात येणार होती.
मात्र, बहुधा एकताच्या गुरुजींनी तिला या पंधरा दिवसांच्या श्राद्धकाळाची माहिती दिल्यामुळे असेल तिने ही मालिका आणखी आठवडाभर पुढे ढकलली आहे. या मालिकेत तिचे दोन्ही लाडके कलाकार, तिचा आवडता विषय असा सगळा मामला जमून आला असल्याने मालिकेची सुरुवातही तितकीच चांगली व्हावी, अशी एकताची इच्छा आहे. म्हणूनच आता २० ऑक्टोबरला ही मालिका सोनी टीव्हीवर दाखल होणार आहे.