अगदी अलीकडच्या काळात दोन खानांचे कुश्तीपट आणि एक थेट रिसायकल झालेल्या हॉलीवूडपटाचे हिंदीमयी रूपांतर असे सकारात्मकतेचा डोस पुरविणारे आणि मुष्टीयुद्धाविषयीचे सामान्यज्ञान देणारे चित्रपट पचविलेल्या सिनेप्रेमींना सध्या ब्रिटनमध्ये चर्चेत असलेल्या ‘जॉबोन’ या चित्रपटाविषयी जाणून घेणे महत्त्वाचे ठरू शकेल. कारण हॉलीवूडच्या परंपरागत प्रभावामुळे आधीच ब्रिटिश सिनेमे आपल्या थिएटरमध्ये लागणे अशक्य असते. त्यात नेटयुगातही ते आपल्याकडे समजण्यासाठी ऑस्कर, बाफ्टा आणि गोल्डन ग्लोब चित्रपटांसाठी झालेल्या नामांकनांचाच आधार असतो. या वार्षिक टप्प्याआड अनेक ब्रिटिश चित्रपट फक्त सिनेनेटसंशोधकांपुरतेच मर्यादित असतात. केन लोच या आर्टफिल्म बनविणाऱ्या दिग्दर्शकापासून निख्खळ मनोरंजनाची एक्स्प्रेस दामटणाऱ्या एडगर राइट या चित्रकर्त्यांपर्यंत सुंदर चित्रपट बनविणाऱ्या दिग्दर्शकांची मोठी  फळी तेथे कार्यरत आहे. अमेरिका आणि मुंबईसह जगभरच्या देशांत चित्रपट बनविणारे डॅनी बॉएल इथलेच आणि भारतात येऊन गांधी बनविणारे दिवंगत रिचर्ड अ‍ॅटनबरोही इथलेच. हिचकॉकपासून डेव्हिड लीनपर्यंत आणि मायकेल विंटरबॉटमपासून ते गाय रिची, शेन मेडोजपर्यंत कुणाचेही सिनेमे निराश करणार नाहीत. सध्या भरपूर गाजत असलेल्या ‘जॉबोन’ या जिमी हॅरिस अभिनित मुष्टीयुद्धावरील चित्रपटाकडे पाहण्यासाठी आपली मानसिक तयारी बॉलीवूडच्या सुनाटय़कारक मनोरंजनाने केली असली किंवा नसली, तरी हा छोटेखानी चित्रपट मुष्टीयुद्धावरच्या सर्वोत्तम दहा चित्रपटांच्या पंगतीत सहज शिरकाव करणारा आहे. अन् त्यामुळे सध्याचा अनुभूतीस अत्यंत योग्य ब्रिटिश सिनेमा आहे.

‘रेजिंग बुल’ ते ‘मिलिअन डॉलर बेबी’ आणि ‘रॉकी’पटांपासून ते ‘सिण्ड्रेला मॅन’पर्यंत कैक गाजलेल्या चित्रपटांप्रमाणे मुष्टीयुद्धखोर मुख्य व्यक्तिरेखेचा कथानकातून होणारा अवनती ते उन्नतीचा मूलभूत प्रवास ‘जॉबोन’ही काही प्रमाणात करतो. या पारंपरिक हिट चित्रपटांसारखा अतिमेलोड्रामिकतेला मात्र इथे थारा नाही. उगाच डोळे ‘डबडबू’ संवादाची अथवा चमत्कारपूर्ण गोष्टींच्या आहारी न जाता इथले संयतनाटय़ प्रेक्षकाला चित्रपटाशी एकरूप करते.

इथला एककल्ली नायक जिमी मॅक्कबे (जॉनी हॅरिस) चित्रपटाच्या सुरुवातीलाच भेटतो तो चांगलेपणासाठी न् परतीच्या स्थितीत. पूर्वाश्रमीचा बॉक्सिंग चॅम्पियन जिमी आता आर्थिक आणि प्रसिद्धीच्या दृष्टीने पूर्णत: कफल्लक झालेला आहे. मद्याच्या आहारी जाऊन आपले आयुष्य कणकण संपविताना त्याच्यामागे नवे शुक्लकाष्ट लागते ते बेघर होण्याचे. वारशाने आईकडून आलेल्या घराची इमारत सरकार पुनर्विकासासाठी घेत असल्याने जिमीला एका रात्रीत शहरांचे निर्जन रस्ते कवटाळणे भाग पडते. सुरुवातीच्या पंधरा मिनिटांतच घरातील टीव्हीवर सुरू असलेल्या मुष्टीयुद्धाच्या सामन्याकडे पाठ फिरवून मद्यधुंद रडणाऱ्या जिमीची एकंदरीत परिस्थिती कळून येते. बेघर झाल्यानंतर त्याला पहिल्यांदा आठवण होते ती आपल्या बॉक्सिंग क्लबची. तो तेथे दाखल होतो. मधल्या काळातील जिमीच्या कुवर्तनांना विसरून क्लबमालक आणि प्रशिक्षक त्याला स्वीकारतात. मात्र त्याला मद्यधुंदतेच्या जगापासून आणि अवैध सामन्यांपासून दूर राहण्याची तंबी देऊन.

आर्थिकदृष्टय़ा, मानसिकदृष्टय़ा खचलेल्या आणि मद्याच्या व्यसनाने शरीर पूर्णत: पोखरलेल्या जिमीकडे भावनिक नाती नाहीत, सकारात्मकतेचा डोस देणारे मैत्रीपूर्ण हात नाहीत. जीर्णोद्धाराचा मार्ग म्हणून एका अवैध सामना जिंकून प्रचंड मोठी रक्कम मिळविण्याच्या चक्रात तो स्वत:ला पणाला लावतो. त्यात जिंकण्याखेरीज जिमीकडे दुसरा पर्याय शिल्लक राहत नाही. शिक्षकाकडून मानहानी आणि वाढत जाणारा अविश्वास या पर्वात स्वत:शी जिमीची सुरू असलेली लढाई इथे महत्त्वाची आहे. कित्येक वर्षांनंतर पुन्हा मुष्टीयुद्धाच्या क्षेत्रात परतण्यासाठी जिमीचा एकाकी आणि एकांगी लढा हा चित्रपटाचा नाटय़ोत्कट भाग आहे.

जॉनी हॅरिस या अभिनेत्याची ही पहिलीच मुख्य भूमिका आहे आणि दिग्दर्शक थॉमस नॅपर यांचा हा पहिलाच चित्रपटीय प्रयत्न आहे. ‘लंडन टू ब्रायटन’ आणि ‘धिस इज इंग्लंड’ या गाजलेल्या ब्रिटिश चित्रपटांमध्ये छोटय़ा पण लक्षणीय भूमिकांत त्याचा वावर होता. या चित्रपटाचे लेखन खुद्द जॉनी हॅरिस याने आपल्या पूर्वाश्रमीच्या मुष्टीयुद्धाच्या अनुभवांवरून केले आहे. हा वास्तव धागा चित्रपटातल्या अभिनयाची धार आणखी वाढवितो. जरी आणखी तीनेक व्यक्तिरेखा चित्रपटामध्ये असल्या, तरी जॉनी हॅरिसचा हा एकपात्री प्रयोग आहे. चित्रपटभर जिमीच्या आयुष्याचे  किरमिजी आणि दु:खाचे गडद वातावरण पसरलेले दिसते. बहुतांश चित्रपट हा शहराच्या शांत रात्रींमध्ये चित्रित झालेला दिसतो. मद्य सोडविण्यासाठी पुनर्वसन केंद्रातील एका बैठकीत गुपचूप जाऊन स्वत:च्या नावाचा उल्लेख शरमेने टाळू पाहणाऱ्या जिमीच्या आयुष्यातील पुढला टप्पा म्हणजेच शेवट चित्रपटाच्या दृष्टीने अपेक्षित असाच आहे. फक्त त्याकडे जाताना साधेपणामध्येही किती परिणामकारकता आणता येऊ शकेल, याची काळजी घेतली गेली आहे. मुष्टीयुद्धाच्या मेलोड्रामिक मनोरंजनाला ठोसा देऊन ठोस काहीतरी पाहिल्याचे सकारात्मक समाधान हा चित्रपट देतो. मुष्टीयुद्धपट पाहण्याची आपली दृष्टी सुपीक असल्यास, या समाधानाचे विजेते कुणीही होऊ शकते.