रिमा लागू यांच्या शिक्षिका जयश्री बापट यांच्याकडून आठवणींना उजाळा

नाटक, चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटविणाऱ्या रीमा लागू सर्वानाच माहीत असल्या, तरी शालेय जीवनात खोडकर आणि नकलाकार नयन भडभडे मला अजून स्मरते.. प्रसिद्ध अभिनेत्री रीमा लागू यांच्या आठवणी जागविताना हुजूरपागा शाळेतील जयश्री बापटबाई यांचा स्वर कातर झाला होता. आपल्या विद्यार्थिनीबद्दल असे ऐकायला मिळणे खूपच दु:खदायी असले तरी ईश्वरी इच्छेपुढे कोणाचेच काही चालत नाही, हे सत्य स्वीकारताना, अजूनही नयन काही डोळ्यासमोरून जात नाही, असे त्या म्हणाल्या.

मूळची मुंबईची असलेल्या नयन हिचा मुंबई-पुणे-मुंबई असा प्रवास झाला. इयत्ता आठवीमध्ये असताना तिने आपल्या शाळेमध्ये प्रवेश घेतला. शाळेत नवीन आलेल्या मुलींना वेगळ्या तुकडीमध्ये प्रवेश दिला जातो. पण, अभ्यासामध्ये मेहनत घेऊन नयनने नववीमध्ये हुशार विद्यार्थिनींच्या तुकडीमध्ये प्रवेश मिळविला. मी तिला मराठी आणि गणित शिकवायचे, असे बापट बाईंनी सांगितले. वैयक्तिक पातळीवर अभिनयाची अनेक बक्षिसे तिने मिळवलीच, पण शाळेचे नावही तिने मोठे केले. आंतरशालेय नाटय़ स्पर्धामध्ये ती मराठी आणि हिंदूी नाटकांतून भूमिका करून हमखास बक्षिसे मिळवून द्यायची. शाळेत असताना तिने ‘वीज म्हणाली धरतीला’ आणि ‘काबुलीवाला’ या नाटकांतून काम केले होते. ‘काबुलीवाला’ नाटकातील तिचा अभिनय पाहून समोर बसलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी यायचे. हरहुन्नरी नयनला शालेय नाटकामध्ये नेहमी पुरुष व्यक्तिरेखा साकाराव्या लागत असत, असेही त्यांनी सांगितले.

नयन १९७० मध्ये पुण्यात शिक्षणासाठी आली. १९७४ मध्ये ती मॅट्रिक झाली. अखरेच्या वर्षी तिने ‘नटसम्राट’ नाटकातील अप्पासाहेब बेलवलकर ही व्यक्तिरेखा साकारली होती. त्या वयामध्ये तिच्यासारख्या मुलीने तात्यासाहेबांचे शब्द आपल्या अभिनयासह पेलणे हे खरेच कौतुकास्पद होते.  ही मुलगी नाव काढणार ही आमची इच्छा तिने चित्रपटसृष्टीमध्ये आपला ठसा उमटवून पूर्ण केली, असेही बापट यांनी सांगितले. शाळा सोडून गेली आणि नंतर तिने अभिनय क्षेत्रात नावलौकिक संपादन केला असला तरी ती शाळेला कधी विसरली नाही. पुण्यात आल्यानंतर तिने अनेकदा शाळेला भेट दिली. वसतिगृहातील खोलीमध्ये जाऊन येत असे. ‘रीमाने त्या वेळी केलेला ‘नटसम्राट’ अजूनही मला आठवतो. ती अकरावीत होती, तर मी इयत्ता पाचवीमध्ये होते,’ अशी आठवण हुजूरपागा प्रशालेच्या कार्यालयीन प्रमुख मानसी पळणीटकर यांनी सांगितली.