कलाकाराच्या आयुष्यात त्याचे वय हा सर्वात महत्त्वाचा घटक मानला जातो. प्रत्येक कलाकाराच्या कारकीर्दीत असा एक काळ येतो जेव्हा तो आपल्या क्षमतेचा संपूर्ण वापर करून त्या विशिष्ट क्षेत्रात सर्वोच्च स्थानी पोहोचण्याचा प्रयत्न करतो. पण काळ जसा पुढे सरकत जातो तसे त्याच्या शारिरीक क्षमतेत घट होत जाते. परिणामी त्याच्या कामगिरीतील सातत्यही कमी होते. सध्या असाच काहीसा अनुभव हॉलिवूड सुपरस्टार जॉनी डेप घेत आहे. त्याने आपल्या आगळ्यावेगळ्या अभिनय शैलीच्या जोरावर एक काळ गाजवला. दुय्यम कलाकार म्हणून कारकीर्दीची सुरुवात करणारा हा अभिनेता आज सिनेसृष्टीतील एक सुपरस्टार म्हणून ओळखला जातो. पण सध्या त्याच्यावर सुरू असणारे कायदेशीर खटल्यांचे जाळे पाहता या यशाला ग्रहणच लागले आहे जणू.. गेल्या वर्षी त्याने त्याच्या बायकोला घटस्फोट दिला. त्यानंतर चित्रपट निर्माता जोकिम रॉनिंगविरुद्ध चाललेला आर्थिक खटला प्रचंड गाजला. पुढे त्याच्या साहाय्यकाने त्याच्या विरोधात खटला दाखल केला आणि आता त्याचे कुटुंबीयच त्याला कोर्टात खेचण्याची तयारी करत आहेत. गेल्या वर्षी त्याने कोर्टातील खटले लढण्यासाठी आपल्या कुटुंबीयांच्या नावाने बॅंकेतून कोटय़वधींचे कर्ज काढले होते. परंतु मधल्या काळात फार मोठा आर्थिक लाभ न झाल्यामुळे त्याला ते कर्ज फेडणे आता कठीण होऊन बसले आहे. दरम्यान, यावर तोडगा म्हणून त्याने कुटुंबीयांची संपत्ती परस्पर विकण्याचा प्रयत्नही केला. पण त्याच्या हालचाली लक्षात येताच त्यांनी त्यावर आक्षेप घेतला. आता या आर्थिक कोंडीमुळे तो संकटांमध्ये अधिक जास्त गुरफटला आहे. क्रिकेटमध्ये शोएब अख्तर, ब्रेट ली यांसारख्या वेगवान गोलंदाजांनी आपल्या वेगाच्या जोरावर अनेक महान फलंदाजांना हतबल केले, पण हळूहळू वयोमानानुसार त्यांची शारीरिक क्षमता घटल्यामुळे त्यांना आपल्या खेळात सातत्य राखता आले नाही. परिणामी त्यांनी निवृत्ती स्वीकारली. जॉनी डेप हादेखील अशाच अवस्थेत आहे. त्याने संपूर्ण सिनेकारकीर्द प्रमुख अभिनेता म्हणून गाजवली. आज वयाच्या ५४व्या वर्षी मनाने तो कितीही तरुण असला तरी शरीराने तो निवृत्तीच्या जवळ पोहोचला आहे. त्यामुळे एकीक डे कमी कमी होत गेलेले काम, पैशाची चणचण आणि कायद्याचा फास यामुळे डेप नावाची किमया लवकर संपुष्टात तर येणार नाही ना अशी भीती त्याच्या चाहत्यांना वाटते आहे.