‘जुडवा २’ या आगामी चित्रपटात वरुण धवन, तापसी पन्नू आणि जॅकलिन फर्नांडिस एकत्र दिसणार आहेत. बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानची प्रमुख भूमिका असलेल्या १९९७ च्या ‘जुडवा’ चित्रपटाचा हा सिक्वल आहे. चाहते ‘जुडवा २’ च्या प्रतिक्षेत असून, सध्या या चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे.

‘जुडवा’ चित्रपटातील ‘टन टना टन’ हे प्रसिध्द गाणे आठवते का? याच गाण्यावर वरुण, तापसी आणि जॅकलिन नृत्य सराव करतानाचा एक व्हिडिओ अलिकडेच समोर आला आहे. अभिजीत भट्टाचार्य आणि पौर्णिमाच्या आवाजातील या गाण्याला अनु मलिकने संगीतबद्ध केले होते. या गाण्याव्यतिरिक्त आधीच्या चित्रपटातील ‘उची हैं बिल्डिंग’ हे अन्य गाणदेखील सिक्वलमध्ये वापरण्यात येणार आहे. चित्रपटाच्या शेवटच्या सत्रातील शूटिंगसाठी सध्या ‘जुडवा २’ची टीम मुंबईमध्ये आहे.

लंडनमधील प्रदीर्घ शूटिंग सत्र संपवून महिन्याभरापूर्वी ‘जुडवा २’चे युनिट भारतात परतले आहे. शूटिंगमधील धमाल-मस्ती चाहत्यांसोबत शेअर करण्यात चित्रपटातील मुख्य कलाकारांनी जरादेखील कसूर केलेली नाही. अनुपम खेर आणि राजपाल यादवदेखील चित्रपटात अभिनय करत आहेत. आधीच्या ‘जुडवा’ चित्रपटातील अनुपम खेर यांनाच ‘जुडवा २’ मध्ये स्थान देण्यात आले आहे. अनुपम खेर आणि वरुण धवनने ‘मैं तेरा हिरो’ चित्रपटात एकत्र काम केले आहे. ‘जुडवा २’ या बहुप्रतिक्षित चित्रपटात सलमान खान आणि करिश्मा कपूर पाहुण्या कलाकाराच्या रुपात दिसणार आहेत. प्रेम आणि राज ही दुहेरी भूमिका साकारण्याबाबत सलमानने काही सल्ला दिला का, असा प्रश्न अलिकडेच वरुणला विचारण्यात आला होता. ‘ओव्हर स्मार्ट’पणा न करता केवळ वडिलांचेच (दिग्दर्शक डेव्हिड धवन) ऐकण्याचा सल्ला सलमानने दिल्याचे वरुण म्हणाला होता.

‘जुडवा २’ यावर्षी २९ सप्टेंबरला प्रदर्शित होत आहे. सध्या वरुण, तापसी आणि जॅकलिनच्या नृत्य सरावाचा व्हिडिओ पाहा.