गेल्या काही महिन्यांपासून बॉलिवूड आणि टेलिव्हिजन क्षेत्रात लग्नापेक्षा घटस्फोट किंवा ब्रेकअपच्याच बातम्या अधिक असल्याचे चित्र आहे. आता आणखी एक जोडी विभक्त होण्याच्या वाटेवर आहे. टेलिव्हिजनमधील प्रसिद्ध सेलिब्रिटी जोडी जुही परमार आणि सचिन श्रॉफ यांनी आठ वर्षे एकत्र संसार केल्यानंतर ते आता घटस्फोट घेणार असल्याचे वृत्त आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या एक वर्षापासून हे दोघं वेगळे राहत असून, त्यांच्यातील वाद संपुष्टात येण्याची काहीच चिन्हं नाहीत. या दोघांना समायरा ही मुलगी आहे. जुहीने सचिनचे घर सोडल्यापासून मुलगी तिच्याचकडे राहतेय. काही वर्षांपूर्वीच या दोघांमध्ये दुरावा आल्याच्या चर्चा होत्या. मात्र, आमचा संसार खूप सुखात सुरु असल्याचे त्यांनी तेव्हा म्हटले होते.

वाचा : नाशिकची भैरवी बुरड ‘मिस ग्लोबल एशिया’

सचिन – जुहीशी जवळीक असलेल्या व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, लग्नाच्या सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये सर्व ठीक होते. पण, जसजसा काळ लोटत गेला तसे त्यांच्यात छोटे-मोठे वाद होऊ लागले. त्यांच्यातील वाद आता सुटण्याच्या पलीकडे गेले आहेत. जुहीच्या ‘कर्मफल दाता शनी’ या पौराणिक मालिकेच्या लाँचवेळी सचिन अनुपस्थितीत होता. त्यामुळे या दोघांमधील दुरावा यातून स्पष्टपणे दिसून येतो. हे दोघं जवळपास वर्षभरापासून वेगळे राहत आहेत. जुही लवकरच घटस्फोटासाठी अर्ज दाखल करणार आहे.

वाचा : सिंधूच्या विजयावर बिग बी म्हणाले, तिनं करुन दाखवलं

एका मालिकेदरम्यान या दोघांची ओळख झाली होती. त्यानंतर पाच महिन्यांच्या प्रेमप्रकरणानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. २००९ साली जयपूर येथील पॅलेसमध्ये यांच्या लग्नाचा शाही सोहळा पार पडला होता. टॉप ५० शाही लग्नांमध्ये जुही – सचिनच्या लग्न सोहळ्याचा समावेश आहे. दरम्यान, घटस्फोटाच्या वृत्तावर जुही किंवा सचिनने अद्याप कोणतेही वक्तव्य केलेलं नाही.