‘बेबी बेबी’ या गाण्यातून नावारूपाला आलेल्या जस्टिन बिबरने वयाच्या अवघ्या २३व्या वर्षी ग्रॅमी पुरस्कारावर आपले नाव कोरले. ट्विटरवर ९ कोटी ३४ लाख ४१ हजार ९७७ पेक्षा जास्त चाहते असणाऱ्या जस्टिनने लोकप्रियतेच्या बाबतीत मॅडोना, रिहाना, ब्रिटनी स्पीअर्स, लेडी गागा, सेलेना गोमेज, जस्टिन टिंबरलेक या पॉप गायक-संगीतकारांनाही मागे टाकले आहे. परंतु इतकी लोकप्रियता मिळवूनही आपण फार काही मिळवलेले आहे असे त्याला वाटत नाही. त्यामुळे सतत चर्चेत राहण्यासाठी तो काही ना काहीतरी खळबळजनक करण्याच्या प्रयत्नात असतो. नुकतेच त्याने ‘जेल नॉट अ कूल प्लेस’, ‘  नॉट फन’, ‘ नेव्हर अगेन’ हे हॅशटॅग्ज वापरून इन्स्टाग्रामवर एक फोटो अपलोड केला आणि २ लाख ३२२ हजार ६७८ पेक्षा जास्त चाहत्यांनी त्याला लाइक, कॉमेंट आणि शेअर केले आहे. हा फोटो फ्लोरिडा येथील तुरुंगात कैदी म्हणून काढण्यात आला होता. तीन वर्षांपूर्वी फ्लोरिडा पोलिसांनी त्याला दारू पिऊन नागरिकांना मारणे आणि नियमबाह्य़ पद्धतीने कार रेसिंग करणे यासाठी अटक के ली होती. त्या वेळी संपूर्ण दिवस तुरुंगवास भोगणाऱ्या जस्टीनला त्याचा प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला होता. तुरुंगातून बाहेर आल्यावर अशी चूक आपण पुन्हा करणार नाही आणि जेव्हा कधी माझ्या हातून असं काही घडण्याची शक्यता निर्माण होईल तेव्हा मला हा दिवस नक्की आठवेल, असे आश्वासनही त्याने चाहत्यांना दिले होते. त्यामुळे आता हे छायाचित्र इन्स्टाग्रामवर टाकण्यामागे नेमके काय कारण असावे?, या चर्चेत त्याचे चाहते रंगले आहेत.