अभिनेता ह्रतिक रोशन आणि यामी गौतम काही दिवसांपासून त्यांच्या आगामी ‘काबिल’ चित्रपटामुळे चांगलेच चर्चेत आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने यामी गौतमी पहिल्यांदा ह्रतिक रोशनसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. चित्रपटातील गाण्यांना सध्या लोकप्रियता मिळताना दिसत आहे. मात्र या जोडीला प्रेक्षक किती पसंती देतात यासाठी आणखी काही दिवस प्रतिक्षा करावी लागेल. दरम्यान ह्रतिकसोबत काम करताना यामीला ह्रतिकचा अंदाज चांगलाच भावला आहे.  ह्रतिक रोशन विषयी बोलताना यामी म्हणते की,  ह्रतिक हा निस्वार्थी आणि मेहनती अभिनेता आहे. आम्ही कलाकार चित्रपटातील चांगल्या अभिनयासाठी नेहमीच कठीण परिश्रम घेत असतो. मात्र ह्रतिक फक्त स्वत:भोवती न गुरफटता सह कलाकारांच्या कामाबद्दल देखील सजग असतो. ह्रतिक रोशनचा बरीच दृष्ये पुन्हा पुन्हा चित्रीत करण्याचा अनुभव देखील यामीने यावेळी शेअर केला.

एखादे दृष्य बरोबर असले तरी ह्रतिकला त्या दृष्यामध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी ह्रतिक प्रयत्नशील असतो, असे यामीने एका मुलाखतीमध्ये सांगितले. त्याच्या या गुणासह ह्रितिक हा विनम्रता असणारा अभिनेता असल्याची पृष्टीही यामीने जोडली. ह्रतिक रोशनमध्ये सेट आणि सेटबाहेरील असे दोन व्यक्तीमत्वे अनुभवल्याचे यामीने यावेळी सांगितले. सेटवरचा हा स्टार जेव्हा आपल्या खोलीमध्ये येतो तेव्हा तो सामान्यपणे वावरताना दिसतो, असे यामी म्हणाली. त्याच्या या गुणामुळे ह्रतिक हा  सेटवरील प्रेरणादायी व्यक्तिमत्व असल्याचे सांगायलाही यामी विसरली नाही.

बॉलीवूडचा हॅण्डसम हंक हृतिक रोशन आणि अभिनेत्री यामी गौतम यांचा ‘काबिल’ हा चित्रपट येत्या २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. हे दोन्ही कलाकार प्रेक्षकांवर आपल्या अभिनयाची भुरळ पाडण्यास सज्ज झाले आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर आणि काही गाणी यापूर्वीच प्रदर्शित झाली असून त्याला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, चित्रपटांमध्ये रोमॅण्टिक भूमिकाही साकारणा-या हृतिकला रोमान्स ही एक भ्रामक कल्पना वाटते. काही दिवसांपूर्वीच अभिनेता हृतिक रोशनने रोमान्सविषयीची त्याची संकल्पना स्पष्ट केली होती. आगामी ‘काबिल’ चित्रपटासाठी सज्ज झालेला हृतिक म्हणला होता की, ‘प्रेम नाही तर रोमान्स आंधळा असतो. रोमान्स ही सर्वात जास्त घातक गोष्ट आहे. कारण, हे सर्वकाही भ्रामक आहे’. ‘रोमान्सनंतर जर का कोणती गोष्ट अस्तित्वात राहते तर ती म्हणजे प्रेम. आणि प्रेम आंधळं नसतं’. इतर लोक आपल्याबद्दल काय बोलतात, काय विचार करतात या नकारात्मक गोष्टींवर हृतिक जास्त लक्ष देत नाही. याऊलट बोल लावणाऱ्या या अशा लोकांच्या चुका माफ करण्यातच हृतिक सकारात्मकता मानतो.