‘मोहेंजोदारो’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरल्यानंतर हृतिक रोशन ‘काबील’ या चित्रपटातून कमबॅक करणार आहे. या चित्रपटात हृतिक रोशन आणि यामी गौतम यांच्या मुख्य भूमिका असून या चित्रपटाची निर्मिती राकेश रोशन यांनी केली आहे. तर याचे दिग्दर्शन दिग्दर्शक संजय गुप्ताने केलेय. शाहरूख खानच्या ‘रईस’ चित्रपटाशी ह्रतिकला टक्कर द्यायची असली तरी, चित्रपटाच्या प्रमोशनामध्ये मेहनत घेण्यापेक्षा ह्रतिकने आपल्या मुलांना वेळ देणे पसंत केले आहे. सुट्टीच्या काळात चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र राहण्यापेक्षा नाताळ आणि नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी ह्रतिक रेहान आणि ऱ्हिदान यांच्यासोबत आनंद साजरा करणार आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काबीलच्या प्रमोशनापासून अलिप्त होऊन ह्रतिक आपल्या दोन मुलांसमवेत वेळ घालविणार आहे. १९ डिसेंबर ते २ जानेवारीमध्ये काबीलच्या प्रमोशनाला सुरुवात करण्यात येणार आहे. मात्र याकाळात ह्रतिक आपल्या मुलांसोबत व्यग्र दिसणार आहे. ह्रतिकला रेहान आणि ऱ्हिदान अशी दोन मुले आहेत. १० आणि ८ वर्षाच्या मुलांसोबत वेळ घालविण्याचे ह्रतिकने नियोजन केले असून त्याच्या फेसबुक फॅन क्लबवरुन यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच ‘काबील’चा पहिला टीझर प्रदर्शित करण्यात आला होता.  ‘मोहेंजोदारो’ चित्रपट बॉक्स ऑफिसवरील अपयशानंतर हृतिकला आता कमबॅक करण्यासाठी एका दमदार चित्रपटाची गरज होती. ‘काबील’चा टीझर हा काहीसा मानवी इंद्रियांना आव्हान करणारा आहे. यात रस्त्यावरील पथदिवे धुसर दाखविण्यात आले असून हृतिकचा आवाज आपल्याला मार्गदर्शन करतो. आपल्याकडे डोळे असूनही आपण पाहू शकत नाही, आपल्याकडे कान असूनही आपण ऐकू शकत नाही, आवाज असूनही बोलू शकत नाही आणि समजत असूनही आपण समजावून सांगू शकत नाही असे हृतिकच्या आवाजात टीझरमध्ये सांगण्यात आले आहे.

या चित्रपटात हृतिक एका अंध मिमिक्री आर्टीस्टची व्यक्तिरेखा साकारत आहे. बॉलीवूड शहेनशहा अमिताभ बच्चन आणि बॉलीवूडमधील काही नावाजलेल्या व्यक्तिंचा तो यात आवाज काढताना दिसेल. दरम्यान, हृतिक रोशन हा आशुतोष गोवारीकरच्या ‘मोहंजोदारो’ चित्रपटात दिसला होता. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नाही. त्यामुळे, हृतिकच्या करियरसाठी काबील चित्रपट चालणे फार गरजेचे आहे.