बॉलीवूडमध्ये ‘काला चश्मा’, ‘कर गई चुल’, ‘लंडन ठुमकदा’ यांसारख्या गाण्यांनी प्रसिद्धीस आलेली गायिका नेहा कक्कर हिला वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. तिच्यासोबत असे काही घडले ज्याची ती कल्पनाही करू शकत नव्हती. एका लग्नाच्या कार्यक्रमात तब्येत बरी नसतानाही नेहावर गाण्यासाठी बळजबरी करण्यात आली. त्यावेळी अत्यंत असंवेदनशील वागणूक मिळाल्यामुळे तिला स्टेजवरच रडू कोसळले. यासंबंधीत पोस्ट नेहाने फेसबुकवर शेअर केली आहे.

हिंदी चित्रपटसृष्टीत पार्श्वगायिका असलेली नेहा ही लाइव्ह शो आणि लग्न समारंभातही गाण्याचे कार्यक्रम करते. त्याचमुळे तिला एका कार्यक्रमासाठी बोलवण्यात आले होते. मात्र, ती जेव्हा कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहचली तेव्हा तिला कळाले की, आज प्री-वेडिंग कार्यक्रम नसून लग्न सोहळाच आहे. त्यानंतर तिला जबरदस्तीने गाणी गाण्यास सांगण्यात आले. यादरम्यान नेहाची तब्येत बिघडल्याने ती सादरीकरण करण्याच्या परिस्थितीत नव्हती. हे तिने आयोजकांना सांगूनही तिला जबरदस्तीने गाणी म्हणावी लागली.

खरंतर नेहाला लग्न सोहळ्यात गाणे पसंत नाही. केवळ तिने शब्द दिला होता म्हणून ती या कार्यक्रमात आली होती. लग्नात न गाण्याच्या तिच्या अटीविरुद्ध जाऊन तिने एक तास परफॉर्म करण्यास होकार दिला. नेहाने सदर घटनेबद्दल फेसबुकवर पोस्ट केलेय की, आम्ही सेलिब्रेटी आहोत म्हणून लोक आम्हाला त्यांच्या हातातील खेळणे समजतात. मी प्रि-वेडिंग कार्यक्रम करते हे माहित असूनही मला मुख्य लग्न सोहळ्यात सादरीकरण करण्यास भाग पाडले. इव्हेन्ट कंपनीने प्रि-वेडिंग कार्यक्रम असल्याचे सांगून आमची फसवणूक केली. पण, आम्ही शब्द दिल्याने शेवटी सादरीकरण करणे आम्हाला भाग होते. माझी तब्येत ठीक नसतानाही मी ६० मिनिटं सादरीकरण केले. मात्र, तब्येत ठीक नसल्यामुळे मला त्यानंतर गाणे अशक्य झाले. याबद्दल मी आयोजकांना सांगितले. मी त्यांची माफी मागितली. पण, अजून काही गाणी म्हटल्याशिवाय तू येथून जाऊ शकत नाही,  असे त्यांनी मला सांगितले. नाईलाजाने मी पुन्हा स्टेजवर गेले आणि मला माझे अश्रू अनावर झाले. आज मी जे काही आहे ते केवळ तुमच्यासारख्या चाहत्यांमुळे आहे. पण, जेव्हा माझी तब्येत ठीक नसेल तेव्हा न गाण्याचा अधिकार मला आहे ना?