सलमानच्या सुलतान आणि आमीर खानच्या पीके सिनेमांची कमाई बघून जर तुम्ही खुष झाला असाल, तर ‘कबाली’ सिनेमाची कमाई पाहून तुम्ही थक्कच व्हाल यात काही शंका नाही. सुपरस्टार रजनीकांत यांच्या ‘कबाली’ सिनेमाने काही दिवसांतच ४०० कोटींची कमाई केली आहे असे सिनेमाचे निर्माते कलैपुली एस धानु यांनी सांगितले. आतापर्यंत २०० कोटींची बॉक्स ऑफिस कमाई या सिनेमाने केली असून सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच सिनेमातल्या गाण्यांचे हक्क विकून २०० कोटींची कमाई केली होती.
‘कबाली’ने आतापर्यंत ९० कोटींची कमाई परदेशातून केली आहे. त्यातले २८ कोटी हे केवळ अमेरिकेमधून कमवले आहेत. उत्तम कलेक्शन करणाऱ्या अमेरिकेतल्या १० सिनेमांपैकी एक म्हणून ‘कबाली’कडे पाहिलं जात आहे. पहिल्या आठवड्यात साधारणतः १०० कोटींची कमाई या सिनेमाने केली.
‘गेल्या १०० वर्षांच्या सिनेमाचे सगळे कलेक्शन रेकॉर्ड्स या सिनेमाने मोडले. माझा आनंद मी शब्दांत व्यक्त करू शकत नाहीए. मी हे दिवस कधीच विसरणार नाही,’ अशा शब्दांत निर्माते धानु यांनी आपले मत मांडले.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा संपूर्ण सिनेमा ७५ कोटींमध्ये बनवण्यात आला. तर त्यातले ५० ते ६० कोटी हे फक्त आघाडीच्या कलाकारांचे मानधन होते. मलेशियामध्ये तिथल्या तमिळ लोकांच्या हक्कासाठी लढणारा डॉन अशी या सिनेमाची कथा आहे. यात राधिका आपटे ही रजनीकांतची बायको दाखवली आहे.
अधिकतर सिनेमा चेन्नईमध्ये चित्रित झाला असून मलेशियामध्ये ज्या महागड्या गाड्या वापरण्यात आल्या त्या तिथल्या स्थानिक फॅन्सनीच देऊ केल्या.
ही कलेक्शनची गणितं पाहता सिनेमांचा सुपरस्टार केवळ एकच आहे आणि तो म्हणजे रजनीकांत असं म्हणायला हरकत नाही.