चित्रपटगृहांमध्ये चाहत्यांची गर्दी; तीन दिवसांत १०० कोटी?

‘कबाली’च्या निमित्ताने चित्रपट प्रदर्शनाच्या इतिहासात बहुदा पहिल्यांदाच मुंबईत सकाळी सहा वाजल्यापासून खेळ सुरू झाला आणि रजनीकांत यांच्या चाहत्यांनी पहिल्या खेळाला अभुतपूर्व गर्दी करून आपले ‘रजनी’प्रेम दाखवून दिले. रजनीकांत यांच्या चाहत्यांमुळे गेले काही दिवस मुंबईतील दाक्षिणात्य समाजबहुल भाग ‘कबाली’मय झाला आहे. चित्रपट प्रदर्शनानंतर तर येथील उत्साह पार टीपेला पोहोचला. आता ‘बाहुबली’चा विक्रम ‘कबाली’ मोडणार का, यावर चित्रपटप्रेमी रसिकांमध्ये चर्चा सुरु झाली आहे.

मुंबई शहर आणि उपनगरातील सर्वच चित्रपटगृहातून ‘कबाली’चे पाच ते सहा खेळ शुक्रवारपासून सुरु झाले आहेत. ‘कबाली’ची प्रसिद्धी आणि रजनीकांत यांचे चाहते यामुळे सर्व चित्रपटगृहातील खेळ ‘हाऊसफुल्ल’ होते.

२०१४ मध्ये आलेल्या ‘लिंगा’नंतर रजनीकांत यांचा ‘कबाली’ हा चित्रपट शुक्रवारी मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशभरात प्रदर्शित झाला. रजनीकांत यांचा चित्रपट म्हणजे माटुंग्यातील ‘अरोरा’ चित्रपटगृहात दसरा-दिवाळीसारखे उत्सवी वातावरण असते. शुक्रवारी ही याची पुन्हा प्रचिती आली. चित्रपटगृहाबाहेर रजनीकांत यांचे मोठे कटआऊट् लावण्यात आले असून या चित्रपटगृहात ‘कबाली’चे दररोज पाच खेळ दाखवण्यात येणार आहेत. एवढेच नव्हे तर पहाटे तीन वाजता रजनीकांत यांच्या चाहत्यांना हा चित्रपट पाहता यावा याकरिता विशेष खेळ लावण्यासाठी परवानगी मिळविण्यासाठी चित्रपटगृहाचे मालक नम्बी राजन यांचे प्रयत्न सुरू आहेत.

मुंबई शहर आणि उपनगरात ‘कबाली’च्या जाहिरातीही वेगळ्या पध्दतीने करण्यात आल्या आहेत. पश्चिम रेल्वेमध्ये ‘कबाली’ची जाहिरात खुद्द रजनीकांत यांच्या आवाजात ऐकायला मिळते. ‘यात्रीगण कृपया ध्यान दे..’ अशा शब्दांत प्रवाशांना आवाहन करत रजनीकांत यांनी ‘कबाली’ पाहण्याचे आवाहन केले आहे.

रजनीकांत यांचे ‘कबाली’ चित्रपटातील छायाचित्र रंगवण्यात आलेली डबलडेकर ‘कबाली’ बस मुंबईतील काही महत्वाच्या ठिकाणी फिरते आहे.

रजनीकांत यांच्या चेहऱ्याचे मुखवटे घातलेले त्यांचे चाहते चित्रपटगृहाबाहेर तसेच रेल्वे स्थानकावर पाहायला मिळत आहेत. शहरातील भिंतीही सध्या रजनीकांत यांच्या चित्रांनी रंगल्या आहेत. ‘अरोरा’ चित्रपटगृहात शुक्रवारच्या फर्स्ट डे फर्स्ट शोपासून रविवापर्यंत शोजचे अ‍ॅडव्हान्स बुकिंग पूर्ण होत आले असल्याने पहिल्या तीन दिवसांत हा चित्रपट १०० कोटींचा आकडा पार करेल, असा ट्रेड विश्लेषकांचा अंदाज आहे.