अभिनेत्री विद्या बालन तिच्या ‘कहानी’ या यशस्वी चित्रपटाच्या दुसऱ्या भागामध्ये एका अनोख्या भूमिकेत दिसणार आहे. नुकतेच तिच्या आगामी चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला होता. स्वतः विद्यानेच तिच्या ट्विटर हॅण्डलवरून फर्स्ट लूक शेअर केला होता. यामध्ये ती फरारी आरोपीच्या भूमिकेत दिसत होती. अपहरण आणि हत्या या घटनेच्या पार्श्वभूमीवर आधारित कथानकामध्ये विद्या बालन पोलिसांपासून स्व:ताचा बचाव करता दिसेल. या चित्रपटात ती ‘दुर्गा राणी सिंग’ या ३६ वर्षीय वंचित आरोपीची भूमिका साकारताना दिसणार आहे. यापूर्वी ‘कहाणी’ या ९ मार्च २०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटात विद्याने एका गरोदर महिलेची भूमिका साकारली होती. संपूर्ण चित्रपटात उदरात बाळ असल्याचे भासविल्यानंतर चित्रपटाच्या अखेरीस ती गरोदर नसल्याचे समोर आले होते. तिच्या या रहस्यमय चित्रपटातील भूमिकेमुळे ती कौतुकास पात्र देखील ठरली होती.
‘कहानी २’ चित्रपटाच्या फर्स्ट लूकनंतर  आता त्याचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘मी कोणाचे अपहरण किंवा हत्या केली नाही,’ असे विद्या टीझरमध्ये बोलताना दिसते. कोणीतरी आपल्या विरुद्ध कट रचत असल्याचेही ती म्हणते. विद्याने व्हिडिओ पोस्ट करत त्यावर एक कॅप्शन लिहले आहे. ‘जोपर्यंत मला दोषी ठरवले जात नाही. तोपर्यंत मी निर्दोष आहे,’ असे तिने म्हटलेय. ‘कहानी’च्या पहिल्या भागाप्रमाणे सिक्वलचे दिग्दर्शनही सुजॉय घोषच करणार आहे. विद्याच्या ‘कहानी २’ची झलक ही थक्क करणारी असल्यामुळे तिच्या पहिल्या ‘कहाणी’प्रमाणे या दुसऱ्या कहाणीत नक्की काय रहस्य असेल याची प्रेक्षकांना उत्सुकता असेल. पहिल्या ‘कहानी’त मिळवलेले यश कायम ठेवण्यासाठी विद्या बालनने अधिक मेहनत घेतली आहे. आगामी चित्रपटातील तिची झलक तिने मेहनत केल्याची अनुभूती देणारी अशी आहे. चित्रपटाच्या फर्स्ट लूकमध्ये विद्याला आरोपी दाखविण्यात आल्यामुळे तिने कोणाची हत्या किंवा अपहरण का केले? किंवा तिला यात अडकविण्यात आले आहे का? याचीही प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली असेल.
दरम्यान, विद्या बालनचा ‘कहानी २’ आणि आलिया भट्टचा ‘डियर जिंदगी’ या दोन चित्रपटांमध्ये टक्कर होऊ नये यासाठी निर्माता जयंतीलाल यांनी आर्थिक नुकसान टाळण्यासाठी चित्रपट प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी २५ नोव्हेंबरला प्रदर्शित होणाऱ्या विद्याची कहाणी पाहण्यासाठी प्रेक्षकांना २ डिसेंबरपर्यंत प्रतिक्षा करावी लागणार आहे.