दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष लवकरच वेलैला पट्टधारी या सिनेमाचा सिक्वल ‘व्हीआयपी २’ चे चित्रिकरण लवकरच सुरु होणार आहे. या सिनेमात एक बॉलिवूड अभिनेत्रीही महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे अशी चर्चा होती. ती अभिनेत्री कोण ते मात्र आतापर्यंत कळू शकले नव्हते. पण आता या नावावरचाही पडदा उघडला गेला आहे. धनुषसोबत काजोल या सिक्वलमध्ये काम करणार आहे. मीडियामध्ये आलेल्या बातमींनुसार सध्या अभिनेत्रीसाठी जवळपास काजोलचेच नाव अंतिम करण्यात आले आहे.

असे असले तरी काजोलकडून अजून याबाबद कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या सिनेमाच्या निर्मात्यांनी काजोलला ४ कोटींपेक्षाही जास्त मानधन देण्याचे मान्य केले आहे. जर काजोलने या सिनेमाचा स्विकार केला तर ती अनेक वर्षांनी कॉलिवूडमध्ये पुर्नरागमन करणार आहे. काजोलने १९९७ मध्ये ‘मिनसरा काना’ या तमिळ सिनेमात काम केले होते.

दरम्यान, ‘शिवाय’ या सिनेमाच्या निमित्ताने गेले काही काळ व्यग्र असलेली अभिनेत्री काजोल लवकरच पुन्हा एकदा एका सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमामध्ये काजोल ‘सिंगल मदर’च्या भूमिकेत दिसणार आहे. या भूमिकेसठी सध्या काजोल फारच उत्सुक आहे. पुढच्या वर्षी या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार असून आनंद गांधी या सिनेमाचे दिग्दर्शन करत असल्याची चर्चा आहे. या सिनेमाच्या निर्मितीची धुरा अभिनेता अजय देवगण सांभाळणार आहे. ती या सिनेमामध्ये ‘सिंगल मदर’च्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाची पटकथा आणि भूमिका आवडल्याचे म्हणत काजोलने तिची उत्सुकता व्यक्त केली होती.

काजोलच्या मते चांगले दिसण्यासाठी कलाकारांवर चाहते आणि प्रसारमाध्यमांमुळे एक प्रकारचा तणाव असतो. आधीच्या काळात कलाकारांवर अशा प्रकारचा तणाव नसायचा असे म्हणत काजोलने अनेकांचेच लक्ष वेधले होते. सकाळ असो वा दुपार आम्ही कलाकार ज्यावेळी घराबाहेर पडतो त्यावेळी नेहमीच आम्हाला चांगले दिसावे लागते, असेही काजोल म्हणाली. ‘मी या सर्व गोष्टींकडे लक्ष देत नाही. मी आहे त्याच अवस्थेत चांगली आहे’, असे काजोलने स्पष्ट केले होते.