मराठी प्रेक्षकांच्या मनाचा अचुक ठाव घेत सध्या झी युवा ही वाहिनी विविध मालिकांच्या सहाय्याने मनोरंजनाची मेजवानी प्रेक्षकांसाठी सादर करत आहे. तरुणाईचे स्पंदन अचूक टिपलेल्या झी युवाच्या वतीने मराठी इंडस्ट्रीतील अनेक दिग्गज कलाकार मंगळवारी २४ जानेवारीला कोल्हापुरात ‘कल्ला’ या कार्यक्रमासाठी येणार आहेत. कार्यक्रमाच्या निमित्ताने कोल्हापूरकरांना मनोरंजनाची धमाल पर्वणी पाहायला मिळणार आहे. झी युवाच्या ‘कल्ला’ या कार्यक्रमात मंगळवारी ‘ही पोरी साजूक तुपातली’च्या ठेक्यावर थिरकायला लावणारी शिबानी दांडेकर, श्रावणबाळ रॉकस्टार मालिकेत ‘कामिनी’ साकारणारी केतकी पालव, मराठी इंडस्ट्रीतला नवा रफटफ हिरो गश्मीर महाजनी, ‘ऑनलाइन बिनलाइन’ सिनेमातून पदार्पणातच पसंतीची पावती मिळवणारी ऋतुजा शिंदे, टीनएजर्सच्या इमोशन्स कॅच करणारा प्रथमेश परब आणि डान्सक्वीन मानसी नाईक यांचा कोल्हापुरात सेलिब्रिटी कल्ला होणार आहे. २४ जानेवारीला सायंकाळी सहा वाजता शाहू खासबाग मैदान येथे ही जल्लोषी सायंकाळ रंगणार आहे.

लाल मातीतील कुस्त्यांचे डाव रंगणाऱ्या शाहू खासबाग मैदान येथे दोन दिवस ‘भीमा फेस्टिव्हल’ रंगणार आहे. या महोत्सवाची सांगता झी युवाच्या कलाकारांच्या डान्स आणि धमाल परफॉर्मन्सच्या कल्ल्याने होणार आहे. सध्या तरूणाईला वेड लावलेल्या झी युवा या वाहिनीने या कार्यक्रमाचे संयोजन केले आहे. नव्या वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात मनोरंजनाला चढणारी नशा अनुभवण्यासाठी कोल्हापूरकरही आतूर झाले आहेत.

वाचा: कथा ‘चॉकलेट गर्ल’ची

‘टाइमपास’ सिनेमातील ‘ही पोरी साजूक तुपातली… तिला म्हावऱ्याचा लागलाय नाद’ या गाण्याने तरूणाईवर गारूड केले आहे. लग्नाच्या वरातीपासून कॉलेजच्या गॅदरिंगपर्यंत या गाण्याने मोहिनी घातली आहे. या गाण्याला ठसकेबाज आवाज देणाऱ्या शिबानी दांडेकरचा डान्स या ‘कल्ला’च्या मंचावर होणार आहे. सिक्सपॅक्स अॅब्ज आणि तितकाच गोड चेहरा असलेल्या गश्मीरवर सध्या तरूणी फिदा आहेत. कोल्हापुरातच चित्रीकरण झालेल्या ‘कॅरी ऑन मराठा’ सिनेमापासून अल्पावधीतच अभिनयक्षेत्रात स्थान पटकावणाऱ्या गश्मीरचे नृत्यकौशल्यही अफलातून आहे. त्यामुळे गश्मीर त्याच्या अफलातून नृत्यशैलीने कोल्हापूरकरांना ठेका धरायला लावणार आहे. सोबत स्टँडअप कॉमेडीत हसवणूक करणारी प्राजक्ता हणमगर आणि अतुल तोडणकर ही जोडी आणि ‘लव्ह लग्न लोचा’ची काव्या, चॉकलेट हिरो सिद्धार्थ चांदेकर याचा ‘नाचो सेशन्स’ही असणार आहे. हा कार्यक्रम लवकरच झी युवावर दाखवण्यात येईल.