‘अस्तित्व’आयोजित दिवंगत मु. ब. यंदे पुरस्कृत ‘कल्पना एक आविष्कार अनेक’ या एकांकिाका स्पर्धेची अंतिम फेरी शनिवार ३ ऑक्टोबर रोजी मुंबईत ‘एनसीपीए’ येथे होणार आहे. अंतिम फेरीत पाच एकांकिका सादर होणार आहेत. ज्येष्ठ कवी आणि गीतकार गुलजार यांच्या ‘अलाव’ही कविता यंदाच्या वर्षी विषय म्हणून देण्यात आली होती.
स्पर्धेची प्राथमिक फेरी २६ सप्टेंबर रोजी पार पडली. या फेरीत एकूण २९ एकांकिका सादर झाल्या. चंद्रकांत मेहेंदळे, वामन तावडे, भालचंद्र झा, नीळकंठ कदम, प्रमोद लिमये, राजन पाटील यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
अखिल भारतीय मराठी नाटय़परिषद मध्यवर्ती शाखा निर्मित महेंद्र तेरेदेसाई लिखित आणि डॉ. अनिल बांदिवडेकर दिग्दर्शित ‘टर्मिनल’, थिएटर-ठाणे निर्मित प्रसाद दाणी लिखित व प्रसाद सुभाष दिग्दर्शित ‘मै वारी जावा’, नवी मुंबई म्युझिक अ‍ॅण्ड ड्रामा सर्कल निर्मित, भारती म्हात्रे लिखित व विवेक भगत दिग्दर्शित ‘चैतन्य अलवार नात्याचे’, प्रवेश-मुंबई निर्मित भाग्यश्री पागे लिखित व संदेश जाधव दिग्दर्शित ‘ऋणानुबंध’, फिनिक्स-मुंबई निर्मित स्वप्नील चव्हाण लिखित आणि गिरीश सावंत दिग्दर्शित ‘मन्वंतर’ या पाच एकांकिका अंतिम फेरीत सादर होणार आहेत.दीपक करंजीकर, ललित प्रभाकर या सेलिब्रेटींसह अन्य मान्यवर स्पर्धेच्या अंतिम फेरीत सहभागी होत आहेत. स्पर्धेची तिकिटे ‘एनसीपीए’ तसेच bookmyshow.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. नरिमन पॉइंट येथील ‘एनसीपीए’च्या प्रायोगिक रंगमंचावर दुपारी चार वाजल्यापासून अंतिम फेरीला सुरुवात होणार आहे.