बिग बॉसच्या माध्यमातून प्रसिद्धीझोतात आलेल्या आणि स्वघोषित समीक्षक असलेला अभिनेता कमाल खान पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. कमाल खानविरोधात वर्सोवा पोलिस ठाण्यात रिझवान सिद्धीकी या वकिलाने नुकतीच तक्रार दाखल केली आहे. याबाबतची अधिकृत माहिती ‘एनआय’ या वृत्तसंस्थेने त्यांच्या ट्विटर अकाउंटवरुन दिली आहे.
ट्विटरवरुन अभिनेत्री आणि मॉडेल्सबद्दल अश्लील आणि आक्षेपार्ह प्रतिक्रिया देणाऱ्या कमाल खान विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘ऑफिसमध्ये काम करतेवेळी मी कमाल खान यांचे ट्विट पाहिले. त्या ट्विटमध्ये त्यांनी एका अश्लील फोटोसह काही आक्षेपार्ह प्रतिक्रिया पोस्ट केल्या होत्या’ असे तक्रार दाखल करणाऱ्या रिझवान सिद्धीकी यांनी सांगितले. कमाल खानच्या ट्विटर अकाउंटवरील ट्वविट्समुळे  त्याच्यावर गुन्हा दाखल होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही काही चित्रपटांबाबत आणि चित्रपट सृष्टीतील कलाकारांबद्दल संदर्भहीन प्रतिक्रिया देणाऱ्या कमाल खान अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कमाल खानने त्याच्या वादग्रस्त ट्विट्स आणि फेसबुक पोस्टमधून आतापर्यंत एकूण १८ अभिनेत्रींबाबत अश्लील आणि आक्षेपार्हतेची विधाने केली आहेत. त्यामुळे नव्याने कमान खानसमोर आता कोणत्या अडचणी उभ्या राहणार आहेत हे खुद्द कमाल खानच जाणत असावा.