कमाल आर खान आणि त्याची तारतम्य नसलेली वक्तव्य नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. या ना त्या विषयावर कोणीही न मागता उगाचच आपलं घोडं पुढे दौडवणाऱ्या या केआरकेने थेट भारतीय महिला क्रिकेट संघातील मिताली राजच्या कामगिरीवरच प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. महिला क्रिकेट विश्वचषकाच्या नुकत्याच पार पडलेल्या सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाला. अगदी अटीतटीच्या या सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाल्यामुळे चाहत्यांचीही निराशा झाली. पण, तरीही अनेकांनीच या खेळाडूंचं कौतुक केलं. पण, या कौतुकात केआरकेने मीठाचा खडा टाकला.

मिताली अंतिम सामन्यात काही विशेष खेळी खेळू शकली नाही. अवघ्या १७ धावा करुन ती तंबूत परतली. तिच्या या निराशाजनक खेळीबद्दल थेट केआरकेने ट्विट केलंय. ‘मिताली राज ज्या पद्धतीने बाद झाली ते पाहता हे सर्व ‘फिक्स’ होतं हे लक्षात येतंय’, असं ट्विट त्याने केलं होतं. मितालीचं नेतृत्त्व आणि खेळ पाहता तिच्यावर अशा प्रकारे आरोप लावणाऱ्या केआरकेला त्यानंतर नेटिझन्सनी चांगलच धारेवर धरलं. त्याच्या या ट्विटचा चांगलाच समाचार घेत केआरकेवरच अनेकांनी टिकेची झोड उठवली.

वाचा : भारतीय संघानंतर मिताली राजकडे ‘या’ संघाचं कर्णधारपद

वाचा : पुढील पिढीसाठी पायाभरणी!

ट्विटरकरांचा होणारा विरोध पाहून त्याने आणखी एक ट्विट केलं ज्यामध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाची पाठराखण करण्यात आली होती. ‘हरणं किंवा जिंकणं हा खेळाचाच एक भाग आहे. मिताली वगळता तुम्ही सर्वांनीच चांगली कामगिरी केली. तुम्ही प्रेरणास्थानी असून देशातील लाखो मुलींना खेळण्यासाठी प्रोत्साहित केलं आहे’, असं ट्विट त्याने केलं. सध्या भारतीय महिला क्रिकेट संघावर कौतुकाचा वर्षाव होत असून एका अर्थी विश्वचषकाच्या सामन्यात अगदी हाताशी आलेला विजय निसटला असला तरीही या खेळाडूंच्या कामगिरीने अनेकांची मनं जिंकली आहेत असंच म्हणावं लागेल.