‘लॅक्मे फॅशन वीक २०१६’च्या रॅम्पवरही सेल्फीचा ट्रेंड फॉलो करणारी अभिनेत्री कंगना रणौत सध्या अमेरिका वारीमध्ये व्यस्त आहे. ‘सिमरन’ या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने कंगना सध्या अमेरिकेत व्यस्त आहे. वेगळ्या धाटणीच्या भूमिकांना न्याय देणारी बॉलिवूडची ‘क्वीन’ या चित्रपटामध्ये एका ‘हाऊस किपिंग स्टाफ’ची व्यक्तिरेखा साकारताना दिसेल. ‘सिमरन’ या चित्रपटातील भूमिकेसाठी कंगना सध्या कार्यशाळांच्या सत्रांना हजेरी लावत या व्यक्तिरेखेच्या तयारीला लागली आहे. भूमिकेमध्ये काहीही कमतरता राहू नये यासाठी आग्रही असणारी कंगना सध्या अनेकांच्या भेटीही घेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
‘सिमरन’ या चित्रपटाच्या माध्यमातून एका महत्त्वाकांक्षी मुलीभोवती फिरणाऱ्या एका असाधारण कथानकाला हात घालण्यात येणार आहे. सूत्रांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस या चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात होईल. दरम्यान, कंगना चित्रपटाच्या निमित्ताने कार्यशाळांनामध्ये हजेरी लावतानाची छायाचित्रे तिची बहिण रंगोली हिने ट्विटरवर पोस्ट केले आहेत. भूषण कुमार आणि शैलेश सिंग यांच्या निर्मितीत बनणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन हंसल मेहता करणार आहे. सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस चित्रीकरणास सुरुवात होणारा हा चित्रपट पुढच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात प्रदर्शित होण्याची शक्यता सुत्रांमार्फत वर्तविण्यात आली आहे.
‘क्वीन’, ‘तनु’ यांसारख्या विविध भूमिका चोखंदळपणे हाताळणारी कंगना ‘सिमरन’च्या निमित्ताने पुन्हा एकदा हटके पात्र साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाआधी कंगना ‘रंगून’ या चित्रपटातून झळकणार आहे. अभिनेता शाहिद कपूर आणि सैफ अली खान यांच्यासह कंगना महत्त्वाच्या भूमिकेमध्ये दिसेल.