दोन वेळा तिच्या दमदार अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कारांना गवसणी घालणारी अभिनेत्री कंगना रणौत पुन्हा एकदा तिच्या वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्री नेहा धूपियाच्या #NoFilterNeha या कार्यक्रमामध्ये कंगनाने केल्या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या कार्याक्रमामध्ये नेहासोबत बोलताना कंगनाने एका चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी आपण दगडांच्या मागे कपडे बदलल्याचा खुलासा केला आहे. त्या ठिकाणी कोणतीच सुविधा उपलब्ध नसल्यामुळे कंगनाला दगडांचा आधार घ्यावा लागला होता.

या ‘चॅट शो’ मध्ये कंगनाने तिच्या विविध चित्रपटांच्या चित्रीकरणादरम्यान तिला कोणकोणत्या अडचणींचा सामना करावा लागला याचाही खुलासा केला. ‘क्वीन’ चित्रपटाच्या वेळी कंगनाला कॅफेमध्ये जाऊनही कपडे बदलावे लागल्याचे तिने सांगितले. ‘क्वीन’ चित्रपटाचा अनुभव सांगितल्यानंतर कंगनाने तिच्या आगामी ‘रंगून’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचेही अनुभव सांगितले. अरुणाचल प्रदेशमध्ये ‘रंगून’ चित्रपटाच्या चित्रीकरणावेळीही असेच काहीसे झाले होते असे कंगनाने सांगितले. ‘चित्रीकरणाच्या निमित्ताने आम्हाला दूर कुठेतरी गावांमध्ये जावे लागत होते. त्या ठिकाणी साध्या प्रसाधनगृह किंवा आरामगृहांचीही सोय नव्हती. मग अशा वेळी दगडांमागे कपडे बदलण्यापासून इतर कामांसाठी सुद्धा मोठमोठ्या दगडांचाच आधार घ्यावा लागत होता’, असे कंगना म्हणाली.
चित्रपट कलाकार आणि त्यांच्या वाट्याला येणारे सुख, प्रसिद्धी पाहून अनेकांनाच त्याचा हेवा वाटतो. पण, एका चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी कलाकार मंडळींनाही कधीकधी विविध अडचणींना तोंड द्यावे लागते हेच कंगनाच्या वक्तव्यामुळे स्पष्ट होत आहे.

दरम्यान, ‘क्वीन’ कंगना सध्या तिच्या आगामी ‘सिमरन’ या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. विविध कार्यशाळांना हजेरी लावत कंगनाने या चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात केली आहे. एका घटस्फोटित महिलेच्या जीवनावर भाष्य करणारे कथानक या चित्रपटाद्वारे हाताळण्यात येणार आहे. हंसल मेहता यांच्या दिग्दर्शनात सध्या कंगना या चित्रपटाचे चित्रीकरण करत आहेत.

kangna