बॉलिवूडमध्ये सध्या घराणेशाहीचा मुद्दा खूप गाजतोय. कंगनाने दिग्दर्शक करण जोहरचा उल्लेख ‘मूव्ही माफिया’ असा केल्यानंतर अनेकांनी तिच्या बाजूने आणि तिच्याविरोधात मतं व्यक्त केली. इतकंच नव्हे तर यंदाच्या आयफा पुरस्कार सोहळ्यातही घराणेशाहीचा पुनरुच्चार झाला. इतरांप्रमाणेच कंगनाच्या आगामी ‘सिमरन’ चित्रपटाचा लेखक अपूर्व आसरानीनंही घराणेशाहीवर यावर आपलं मत व्यक्त केलं.

यासंदर्भात अपूर्वने ट्विट केलं की, ‘माझ्या नवीन चित्रपटाच्या पटकथालेखनासाठी माझ्या भावाची मदत घेतली. कंगनाने तिच्या बहिणीला व्यवस्थापक म्हणून नेमलं आणि आता ती तिच्या भावालाही प्रोत्साहित करतेय. आम्ही सगळे घराणेशाहीचे अपराधी आहोत.’ या ट्विटवर कंगनाने जरी काही प्रतिक्रिया दिली नसली तरी तिची बहिण रंगोली आता तिच्या बाजूने धावून आलीये असं म्हणावं लागेल.

‘अॅसिड तुमचा जीव घेत नाही, मात्र तो तुमच्या चेहऱ्याला इतका विद्रूप करतो की तुम्ही जिथेही जाल तिथे लोक तुमच्याकडे निराशेने पाहतात. कंगनाने केवळ माझ्या उपचारासाठीच मदत केली नसून माझा आत्मविश्वास परत मिळवण्यास प्रयत्न केले. माझा धरून तिने मला सेटवर नेलं. एमएससी मायक्रोबायलॉजीमध्ये M.Sc microbiology मी अव्वल होते आणि अॅसिड हल्ल्यानंतर मी माझा आत्मविश्वासच गमावला होता. माझा चेहरा मी झाकून घेत होते. मी तिची बहिण आहे आणि तिच्याइतकीच माझीही पात्रता आणि क्षमता आहे. माझा भाऊ वैमानिक असून त्याला या वादात अडकवण्याचा विचारदेखील तू करू नकोस. लहान भावासोबत बसून कॉफी पिणे, सिनेमा बघण्याला घराणेशाही नाही म्हणत. त्याला प्रेम म्हणतात जे तुला मिळत नाही असंच दिसतंय,’ अशा तीव्र शब्दांत रंगोलीने अपूर्वच्या ट्विटचं प्रत्युत्तर दिलं.

वाचा : ‘कुमकुम भाग्य’विरोधात तक्रार दाखल

घराणेशाहीच्या वादावरून विनाकारण कंगनावर टीकास्त्र सुरु असल्याचा आरोप करत रंगोलीने ट्विटमध्ये पुढे प्रश्न विचारला की, ‘माझ्यावरील अॅसिड हल्ल्यानंतर मी माझा आत्मविश्वास गमावला होता आणि माझ्या बहिणीने तो मला पुन्हा मिळवून दिला. मला तिने जीवनदान दिले. याला तुम्ही घराणेशाही म्हणाल का? कंगनावर टीका करणे तुम्ही थांबवाल का? भावासोबत फिरण्याला, वेळ घालवण्याला घराणेशाही म्हणत नाही मूर्खांनो!’