विनोदवीर कपिल शर्माला कलर्स टीव्हीवरून सोनी टीव्हीवर येणे खरेच फायदेशीर ठरले असेच म्हणावे लागेल. जेवढा कपिलला त्याच्या प्रसिद्धीमध्ये फायदा झाला तेवढाच फायदा सोनी टीव्हीलाही झाला. सोनी टीव्हीने टीआरपीमध्ये एक पायरी वर चढली आहे. टीआरपीमध्ये वाढ होण्यात कपिलचा फार मोठा हात असल्यामुळे सोनीने त्याच्यासोबतचा करार वाढवण्याचे ठरवले आहे. हा करार वाढवून त्यांनी कपिललचा तब्बल ११० कोटी रुपयेही दिले आहेत.

बॉलिवूड लाइफ या इंग्रजी संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार, कपिल सोनी टीव्हीसोबत अजून एक वर्ष म्हणजे २०१७ पर्यंत असणार आहे. कपिल सोनी टीव्हीवर येण्याआधी या वाहिनीच्या एकही मालिका टीआरपीमध्ये नव्हत्या. पण जेव्हा पासून कपिलने या वाहिनीशी करार केला आहे, तेव्हा पासून कपिलचा शो वाहिनीला आठ आणि पाच या क्रमांकामध्ये घेऊन आला आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहिनीसाठी ही किंमत अजिबात मोठी नाहीये, याचे मुख्य कारण म्हणजे कपिल शर्मा शोमुळे वाहिनीला चांगलाच फायदा झाला आहे. याआधी कपिल कलर्स टीव्हीवर हा शो करत होता. पण पैशांच्या वादामुळे कपिलने कलर्स टीव्हाचा करार मोडला आणि सोनी टीव्हीसोबत नव्याने शो सुरु केला. चॅनलवर हा शो याच वर्षी एप्रिल महिन्यात सुरु झाला आणि प्रेक्षकांनी यावेळीही या कार्यक्रमाला तेवढीच पसंती दिली.

आतापर्यंत अनेक कलाकार आणि सेलिब्रिटी या कार्यक्रमात येऊन गेले आहेत. युवराज सिंह, सलमान खान, ऐश्वर्या राय बच्चन यांसारखे अनेक नावाजलेले सेलिब्रिटींनी या शोमध्ये आनंदाने हजेरी लावली आहे. ३५ वर्षीय कपिल शर्माने शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन यांना मागे टाकत २०१६ मध्ये सगळ्यात जास्त सर्च करण्यात येणारा कलाकार बनला होता. तर ‘किस किस को प्यार करु’ या सिनेमात काम करणारा कपिल याहूवर दुसरा सगळ्यात जास्त सर्च केलेला कलाकार बनला होता. या यादीत पहिले स्थान सलमान खानने पटकावले आहे.