विनोदवीर कपिल शर्मा व्यसनमुक्ती केंद्रात दारुचे व्यसन सोडवण्यासाठी ४० दिवसांच्या कोर्सला गेला होता. पण फक्त १२ दिवसांमध्ये कपिल या केंद्रातून बाहेर पडला. कपिलच्या जवळच्या मित्राने ‘डीएनए’ला दिलेल्या माहितीनुसार, ‘त्याच्या आगामी ‘फिरंगी’ सिनेमाचे चित्रीकरणाचे काम अर्धवट राहिल्यामुळे त्याला व्यसनमुक्ती केंद्रातून लवकर निघावे लागले.’

गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने तब्येत बिघडत असल्यामुळे कपिल ‘द कपिल शर्मा शो’वर लक्ष केंद्रित करु शकत नव्हता. पर्यायाने वाहिनीने हा शो बंद करण्याचा निर्णय घेतला. कपिल शर्माची तब्येत खालावल्यामुळे शाहरुख खानसारख्या कलाकाराला त्याची सेटवर वाट पाहून परतावे लागले होते. या सगळ्यात शोचा सर्वात जुना सहकारी किकु शारदाही दुसऱ्या कॉमेडी शोमध्ये गेल्याच्या चर्चा येऊ लागल्या होत्या.

मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘कपिल लवकरच पूर्णपणे तंदुरुस्त होऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार. तो गेल्या काही दिवसांपासून बंगळुरू येथील आयुर्वेदीक सेंटरमध्ये व्यसनमुक्तीसाठी गेला होता. सध्या त्याला आराम करण्यास सांगण्यात आले आहे. याशिवाय त्याला लवकरच ‘फिरंगी’ सिनेमाच्या चित्रीकरणालाही सुरूवात करायची आहे.’

कपिल पुढच्या वर्षी ‘द कपिल शर्मा शो’ घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येईल, असे म्हटले जात असताना कपिलने मात्र तो ऑक्टोबर महिन्यातच परतणार असल्याचे सांगितले. पण अजूनपर्यंत निर्मात्यांनी आणि चॅनलने याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.