कोणत्याही बड्या सेलिब्रिटीच्या नात्यातील नसूनही निव्वळ त्याच्या विनोदी शैलीनेच आजवर कपिल शर्माने रसिकांमध्ये स्वत:चे स्थान बनवले आहे. विनोद करण्याची त्याची हटके शैली, आणि विनोदाची धम्माल वेळ साधत कपिलने अनेकांच्याच चेहऱ्यावर हसू आणले आहे. काही महिन्यांपूर्वी कपिलचा ‘द कपिल शर्मा शो’ प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. विविध पात्र साकारत संपूर्ण टीमच्या सहाय्याने कपिलच्या वाट्याला यश आले आहे. कपिल स्वत:सुद्धा या कार्यक्रमातून विविध रुपांमध्ये दिसला. अशा या तऱ्हेवाईक पात्रांच्या कपिलच्या चमूमध्ये आणखी एका पात्राची एण्ट्री झाली आहे. हे पात्र म्हणजे ‘अरोरा साहाब’. दिल्लीच्या सर्वसामान्य नागरिकाच्या रुपामध्ये मंचावर येणारं हे पात्र सध्या अनेकांच्या पसंतीस उतरत आहे.

डोक्यावर हिवाळ्यात घालतात तशी टोपी, गोलाकार चष्मा, भरगच्च मिशा आणि बोलण्याचा एक वेगळाच बाज यांसह हे ‘अरोरा साहाब’ मंचावर येताच त्यांच्या खुसखुशीत विनोदी शैलीने एकच हास्यबार उडतो. दिल्लीमध्ये राहणाऱ्या एखाद्या व्यक्तिप्रमाणे हे पात्र सर्वांसमोर येत असल्यामुळे तेथील कोणत्याही राजकारणी पक्षाशी हे पात्र मिळतेजुळते वाटल्यास हा निव्वळ योगायोग समजावा. ‘माझ्या आजवरच्या विनोदी कार्यक्रमांच्या कारकिर्दीत ‘अरोरा साहाब’ हे मी पाहिलेलं आजवरचं सर्वात धम्माल पात्र आहे’ अशी प्रशंसा या कार्यक्रमाचा अविभाज्य भाग असणारे नवज्योत सिंग सिद्धू यांनी केली.

दरम्यान, क्रिकेटपटू युवराज सिंग त्याच्या होणाऱ्या पत्नीसह या कार्यक्रमात आला होता त्यावेळी ‘सिटी केबल’च्या प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये युवराजसह या ‘अरोरां’नीही हजेरी लावली होती. ‘अरोरा साहाब’ हे पात्र खुद्द कपिल शर्माच साकारत आहे. त्यामुळे या नव्या पात्राला प्रेक्षक कुठवर साथ देणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. सध्या ‘द कपिल शर्मा शो’मध्ये कपिल शर्मा, अली असगर, सुनील ग्रोवर, किकू शारदा, सुमोना चक्रवर्ती आणि चंदन प्रभाकर ही मंडळी अभिनय करताना नजरेस पडत आहेत.