कपिलच्या मंचावर ‘रईस’मय क्षणानंतर आता योगाची कसरत पाहायला मिळणार आहे. शाहरुखने नुकताच त्याच्या आगामी ‘रईस’ चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी कपिल शर्माच्या ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये दिसला होता. त्यानंतर आता योग गुरु बाबा रामदेव कपिलच्या कार्यक्रमातून योगाचे धडे देणार आहेत. बाबा रामदेव सहभागी झालेल्या भागाचे प्रसारण प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर होणार असल्यामुळे योग कलेसोबतच बाबा रामदेव देशातील तरुणाईला देशभक्तीवर देखील व्याख्यान देताना दिसतील. या कार्यक्रमात बाबा रामदेव यांनी त्यांच्या जीवनातील अनेक किस्से शेअर केले आहेत. यामध्ये त्यांनी परदेशी महिलेने त्यांना लग्नाचा प्रस्ताव दिल्याचे देखील सांगितल्याचे पाहायला मिळणार आहे. लॉस एंजेलिस मध्ये योगाच्या शिबीरामध्ये सहभागी झालेल्या एका महिलेने मला लग्नाचा प्रस्ताव दिला होता. ही महिला या शिबीरामध्ये एकटी आली नव्हती. ती पूर्ण कुटुंबासह माझ्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाली होती. असे त्यांनी म्हटले आहे.


बाबा रामदेव यांनी या कार्यक्रमात भ्रष्टाचारावर देखील व्याख्यान दिले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बाबा रामदेव यांनी कपिलच्या शोमध्ये सहभागी झालेल्या प्रेक्षकांना भ्रष्टाचाराला मूळापासून नष्ट करण्यासाठी जबाबदारी स्वीकारण्याची शिकवण दिली. भ्रष्टाचाराला आळा घालणे फक्त सरकारची मक्तेदारी नाही, तर जनतेनेही जबाबदारपणे भ्रष्टाचाराला पळवून लावण्याची जबाबदारी स्वीकारावी, असे ते म्हणाले. देशभक्ती जागृत करताना बाबा रामदेव यांनी कपिलच्या कार्यक्रमातून ‘भारत माता की जय’, ‘वंन्दे मातरम्’ , आणि  इंकलाब जिंदाबाद अशी घोषणाबाजी करताना देखील दिसणार आहे. या कार्यक्रमात बाबा रामदेव यांच्या आदेशाप्रमाणे माजी क्रिकेटपटू व माजी खासदार नवज्योतसिंग सिद्धू योगा करताना दिसणार आहेत. तर कपिल शर्मा आपल्या नेहमीच्या शैलीत योगा करणाऱ्या सिद्धू यांचे मनोबल वाढविताना दिसणार आहे.

पतंजली आयुर्वेद कंपनीचे प्रमुख योगगुरू रामदेव बाबा यांनी यापूर्वी देखील लग्नासंदर्भात थक्क करणारा दावा केला होता. बॉलिवूडमध्ये चर्चेत राहण्यासाठी काहीही करायला तयार असणारी अभिनेत्री राखी सावंत माझ्याशी लग्न करण्यासाठी उत्सुक असल्याचे त्यांनी म्हटले होते. राखीने माझ्यासोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. यावर मी दिल्लीत माझ्या शिवाय अनेक अविवाहित लोक आहेत, असा सल्ला राखीला दिला होता, असे ते म्हणाले. राखी कधी काय बोलेल हे सांगता येत नसल्यामुळेच मी तिच्याविषयी सहसा वक्तव्य करणे टाळतो, असेही त्यांनी यावेळी म्हटले होते.