बॉलिवूड विश्व आणि करण जोहर म्हणजे एक धम्माल समीकरण आहे. सध्याच्या घडीला बी टाऊनमध्ये हा निर्माता-दिग्दर्शक चर्चेत आहे. चर्चेचे निमित्त काहीही असो, पण चर्चा करणबद्दल असल्यामुळेच ती रंगत आहे असेच म्हणावे लागेल. करणचा ‘कॉफी विथ करण’ हा कार्यक्रम लवकरच सुरु होणार आहे. सेलिब्रिटींसह धम्माल गप्पा मारण्यासाठी करण सज्ज झाला आहे. करणच्या या कार्यक्रमामध्ये तो अनेक कलाकारांची गुपितं गप्पांच्या ओघात कधी उघड करतो हे कलाकारांच्याही लक्षात येत नाही.

कलाकारांच्या बाबतीत काही गोष्टी प्रेक्षकांसमोर उघड करणाऱ्या करणने स्वत:बद्दलही एका गोष्टीचा खुलासा केला आहे. करणने चक्क त्याच्या सौंदर्याविषयी खुलासा केला आहे. करणने या कार्यक्रमाच्या एका व्हिडिओमध्ये हॅण्डसम दिसण्यासाठी आपण एक सर्जरी केल्याचे उघड केले आहे. करणचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये त्याने शरीराचा बांधा नियंत्रणात ठेवण्यासाठीही ‘बोटोक्स’ नावाची सर्जरी केल्याचेही स्पष्ट केले आहे. एवढेच नव्हे तर करणने त्याच्या नाकावरही शस्त्रक्रिया करुन घेतली आहे. करणच्या बाबतील या गोष्टी उघड झाल्यामुळे सध्या तो चर्चेत आहे. बॉलिवूडमध्ये फक्त करणच नव्हे, तर अनेक कलाकारांनी आजवर स्वत:चे सौंदर्य खुलवण्यासाठी सर्जरी केल्या आहेत.

‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमाच्या पहिल्याच भगामध्ये आलिया भट्ट आणि शाहरुख खान करणसोबत गप्पा मारणार आहेत. या कार्यक्रमाच्या उर्वरित भगांमध्ये आणखीन कोणते कलाकार करणसह कॉफीची मजा घेणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.