‘कलाकारांचे जीवन म्हणजे राजेशाही थाट..’ असेच अनेकांना वाटते. पण, खरोखरच असे असते का? निर्माते- दिग्दर्शक करण जोहर आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांचे अनुभव ऐकून तरी निदान असे वाटत नाही. तणावाच्या गंभीर त्रासामुळे एकेकाळी अभिनेत्री दीपिका पदुकोण त्रस्त होती. तिने स्वत:च असे मान्य केले होते. आपल्या काही गंभीर समस्यांबाबत प्रसारमाध्यमांसमोर उघडपणे बोलणाऱ्या कलाकारांमध्ये आता आणखी एका नावाचा समावेश झाला आहे. ते नाव म्हणजे करण जोहर.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आपल्या तणावाविषयी करण म्हणाला, ‘माझ्यातील उत्सुकता आणि आनंदच संपला होता. मला अजीबात झोप यायची नाही. माझ्यामते तो काळ माझ्या जीवनातील सर्वात कठीण काळ होता. बहुतेक माझ्या वडिलांच्या जाण्याच्या धक्क्यातून त्यावेळी मी स्वत:ला सावरु शकलो नव्हतो. जेव्हा तुम्ही एकटे असता, त्यावेळी अशा परिस्थितीत तुमच्या वाट्याला येणारं यश, तुमच्यावर प्रेम करणारी माणसं कुठे जातात? एखाद्यासोबत शेअर करावे असे प्रेम तुमच्याकडे नसते तेव्हा तुम्ही अधिक चिंतीत होता’, असेही करण म्हणाला.

मुलाखतीदरम्यान जीवनातील अशा घातक तणावावर मात करण्याविषयीही करण बोलला. ‘मी यासाठी ‘अॅन्टी-अॅन्क्सायटी मेडीकेशन’चा मार्ग निवडला. जवळपास एक-दीड वर्षांनंतर जेव्हा मी हे उपाय बंद केले तेव्हा माझ्यात झालेला बदल मला जाणवला. आज मी उत्साही आणि अनंदी आहे, माझे आयुष्य परत आल्यासारखेच मला वाटत आहे’ असे करणने स्पष्ट केले.

करण जोहरने तोंड दिलेल्या तणावाच्या या पर्वाची चर्चा होत असतानाच अभिनेत्री दीपिका पदुकोनचच्या नावाचीही चर्चा आहे. कारकीर्दीच्या चढत्या आलेखाच्या वाटेवरच दीपिकानेही तणावाला तोंड दिले होते. कलाकार आणि त्यांच्यात वाढणारे तणावावचे प्रमाण पाहता ही एक गंभीर बाब होऊन बसली आहे. कलाकारांच्या कारकिर्दीवरही या गोष्टीचे कुठेतरी पडसाद उमटताना दिसत आहेत. त्यामुळे कलाकार आणि कलाविश्वामध्ये प्रसिद्धीव्यतिरिक्त इतरही गोष्टी असतात यावर आता अनेकांचा विश्वास बसत आहे.