‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटाच्या प्रदर्शनावरुन सुरु झालेला वाद शमवण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानात उतरले. आज सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि दिग्दर्शक करण जोहर हे दोघेही वर्षा बंगल्यावर दाखल झाले होते. त्यांच्यासोबत प्रोड्युसर असोसिएशनमधील निर्मातेदेखील या बैठकीला उपस्थित होते.

या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर ‘ऐ दिल है मुश्किल’ च्या प्रदर्शनातील सर्व अडथळे दूर झाल्याची माहिती बॉलीवूड निर्माता मुकेश भट यांनी दिली. चित्रपटाचा दिग्दर्शक करण जोहर याने सदर चित्रपटातून मिळणा-या नफ्याचा काही हिस्सा उरी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना मदत म्हणून देण्याची हमी दिली आहे. या पार्श्वभूमीवर चित्रपटाच्या प्रदर्शनाला हिरवा कंदील मिळाला आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा चित्रपटाला असलेला विरोधही मावळल्याचे दिसते. बैठकीनंतर निर्माता मुकेश भट यांनी प्रोड्युसर असोसिएशनतर्फे पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, आपल्याला देशाचा अभिमान आहे आणि आपण आधी भारतीय आहोत. आमच्यासाठी व्यावसायपेक्षा देश महत्त्वाचा आहे. आज आम्ही सर्व निर्माते, दिग्दर्शक करण जोहर आणि राज ठाकरे मुख्यमंत्र्यांना भेटलो. यावेळी आमच्यात सकारात्मक चर्चा झाली. करण जोहरने ‘ऐ दिल है मुश्किल’ चित्रपट प्रदर्शित झाल्यावर त्यातून मिळणारा नफा शहीद जवानांच्या कुटुंबियांना मदत म्हणून देण्याची हमी दिली आहे.  तसेच, यापुढे कोणत्याही पाकिस्तानी कलाकारांना येथील चित्रपटांमध्ये घेतले जाणार नाही, असा निर्णय प्रोड्युसर असोसिएशनने घेतल्याचेही ते म्हणाले. इतकेच नाही तर ‘ऐ दिल है मुश्किल’ चित्रपटगृहात दाखविण्यापूर्वी एक निवेदन साजर केले जाईल. त्यात शहीदांना श्रद्धांजली वाहणारा संदेश दाखविण्यात येईल, असे मुकेश भट म्हणाले.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भूमिका अद्याप समोर यायची आहे. मुख्यमंत्र्यांनी नेमका काय निर्णय घेतला आहे ते लवकरच कळेल. दिवाळीत प्रदर्शित होणा-या ऐ दिल है मुश्किल या चित्रपटाला मनसेने विरोध दर्शविला होता. या चित्रपटात पाकिस्तानी अभिनेता फवाद खान असल्याने मनसेने चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही अशी भूमिका घेतली होती. तर यापुढे पाकिस्तानी कलाकारांसोबत काम करणार नाही असे करण जोहरने जाहीर केले होते. पण या चित्रपटासाठी सुमारे ३०० जणांनी मेहनत घेतल्याने चित्रपटाचे प्रदर्शन होऊ द्यावे अशी विनंतीही त्याने केली होती. पण करण जोहरच्या विनंतीनंतरही मनसेचा विरोध कायम होता. शेवटी करण जोहरने केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा केली. या चर्चेनंतर देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे आणि करण जोहर यांच्यासोबत चर्चा करण्याचा निर्णय घेतला.