‘ऐ दिल है मुश्किल’चा दिग्दर्शक करण जोहरच्या मते, या सिनेमाची कथा लिहायला त्याला फक्त ९ दिवस लागले. मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या १८ व्या ‘मामि चित्रपट महोत्सवा’मध्ये माध्यमांशी बोलताना तो म्हणाला की, ‘मला सिनेमाची कथा लिहायला फक्त ९ दिवस लागले. मी न्यूयॉर्कमध्ये होतो आणि रस्त्यावरुन चालत असताना मी एकतर्फी प्रेमात असणाऱ्या लोकांच्या दुःखाबाबत विचार करत होतो. मीही त्या दुःखातून गेलो आहे. ‘ऐ दिल है मुश्किल’ची कथा तेच दुःख सांगणारी आहे.’ जर एखाद्या महिला दिग्दर्शिकेने जर हा सिनेमा बनवला असता तर तुला नाही वाटत का की हा सिनेमा अजून वेगळा झाला असता? यावर उत्तर देताना करण म्हणाला की, ‘मला महिलांच्या भावना जास्त चांगल्या कळतात त्यामुळे हा सिनेमा कोणा महिला दिग्दर्शिकेने जरी केला असता तरी त्यात फार काही फरक पडला नसता असं मला वाटतं.’

यावेळी करण बोलला की, ‘मी एखादी कथा दोन्ही बाजूने दाखवण्यामध्ये कुशल आहे. अनेकदा तर असंच झालं आहे की मी महिलांच्या बाजूनेच अधिक विचार केला आहे. सिनेमाच्या संगीताबद्दल बोलताना करण म्हणाला की, या सिनेमाचे संगीत एवढं गाजलं याचं संपूर्ण श्रेय प्रीतमलाच जातं. अमिताभ भट्टाचार्य आणि प्रीतम यांची जुगलबंदी कमाल आहे. त्यांनी दिलेलं संगीत हे फक्त वेगळंच आहे असं नाही पण ते माझ्या सिनेमाचा आत्मा आहे. प्रीतम यासाठी खूप खूप धन्यवाद.’ याशिवाय अनुराग कश्यपसारखे तुझे सिनेमे वास्तवदर्शी का नसतात यावर उत्तर देताना तो म्हणाला की, ‘कारण माझे सिनेमे हे प्रेम आणि प्रेमातून येणाऱ्या समस्यांवर अधिक असतात. प्रेक्षक माझ्या सिनेमातल्या प्रत्येक व्यक्तिरेखांच्या भावनांशी स्वतःला एकरुप करतात. तर तुम्हाला असं का वाटतं की माझे सिनेमे हे वास्तववादी नाहीएत?’

करण पुढे म्हणतो की, ‘एखाद्या गोष्टीला सिनेमात दाखवण्याचा अनुराग आणि माझा अंदाज यात खूप फरक आहे. तरी आम्ही दोघंही त्या गोष्टीला वास्तववादी स्वरुपात दाखवतो. तो खरेपणाच्या दृष्टीतून तो सिनेमा दाखवतो तर मी प्रेम आणि त्याच्या भावनांतून सिनेमा दाखवतो. प्रत्येक दिग्दर्शकाची स्वतःची अशी स्टाइल असते. त्यामुळे माझी आणि अनुरागची तुलना होऊ शकत नाही. माझे सिनेमे हे अनुरागच्या सिनेमांपेक्षा काही कमी नाहीत. तुम्ही असं बोलू शकता की आम्ही संगीतातले दोन राग आहोत. आम्ही एकत्रही राहू शकतो.’