‘नागीन २’ मालिकेतील अभिनेता करणवीर बोहराला बेला आणि विएना या दोन जुळ्या मुली आहेत. नुकताच त्याने आपल्या या मुलींचा पहिला वाढदिवस दणक्यात साजरा केला. मुंबईतील एका हॉटेलमध्ये टीव्ही स्टार्सच्या उपस्थितीत हा वाढदिवस साजरा करण्यात आला. बेला आणि विएना यांचा जन्म १९ ऑक्टोबरला कॅनडामध्ये झाला. १९ तारखेला दिवाळी असल्यामुळे त्यांनी वाढदिवसाची पार्टी दिली नव्हती.

 

कॅनडामध्ये करणवीरची पत्नी तीजे हिचे घर आहे. बाळंतपणानंतर सहा महिने तीजे कॅनडामध्येच राहायला होती. करणवीर तेव्हा ‘नागीन २’ मालिकेच्या चित्रीकरणात व्यग्र होता. त्यामुळे वेळात वेळ काढून तो भारत- कॅनडा असा प्रवास करायचा.

त्याच्या दोन्ही मुली फारच क्युट आहेत. करणवीर आणि तीजे दोघंही या दोन्ही मुलींचे फोटो सोशल मीडियावर सतत शेअर करत असतात. इन्स्टाग्रामवर त्यांनी तर या दोन्ही मुलींचे अकाऊंट तयार केले आहे. हे अकाऊंट तीजेच सांभाळते. पिता होण्याच्या आनंदाबद्दल बोलताना करणवीर म्हणाला होता की, ‘मला अजूनही विश्वास बसत नाही की आम्ही पालक झालो आहोत.

मला असं वाटतं की, माझ्या बहिणीच्या मुलींना सांभाळायला मला दिलं आहे आणि मी त्यांचा सांभाळ करतोय.’ दोन्ही मुलींमध्ये बेला जास्त मस्तीखोर आहे. तर विएना फार शांत आहे. या पार्टीत करणवीर आणि तीजेचे टीव्ही जगतातील अनेक मित्र- मैत्रिणींनी हजेरी लावली होती.