गेले वर्षभर चर्चेत असणारी अभिनेत्री करीना कपूर पुन्हा एकदा तिच्या ग्लॅमरस करिअरसाठी सज्ज झाली आहे. ‘सोनी बीबीसी अर्थ’ या वाहिनीची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून ती लोकांसमोर येणार आहे. करीनाच्या खळखळत्या उत्साहाला लक्षात घेऊन वाहिनीने ‘फील अलाईव्ह’ या घोषवाक्यांतर्गत तिची प्रतिनिधी म्हणून निवड केली आहे. करीना गर्भवती असतानाच तिने या वाहिनीच्या प्रसिद्धीसाठी खास व्हिडीओचे चित्रीकरण केले होते. या व्हिडीओची पहिली झलक प्रकाशित करण्यात आली असून यातली करीना पाहिल्यानंतर गल्लिव्हरच्या गोष्टीची आठवण आल्याशिवाय राहणार नाही.

गल्लिव्हरच्या गोष्टीत तो जसा नित्य नवलाईच्या प्रदेशात शिरतो तशीच काहीशी अवस्था या व्हिडीओत करीनाची दिसून येते. ‘सोनी बीबीसी अर्थ’ ही वाहिनी पाहणे प्रेक्षकांसाठी सुखद अनुभव ठरणार आहे. नवीन संकल्पनेवरच्या या वाहिनीसाठी करीनाची निवड करताना तिच्या प्रभावी व्यक्तिमत्त्वाचा आम्ही पहिल्यांदा विचार केला, असे या वाहिनीच्या सूत्रांनी सांगितले. करीनाचे चैतन्य, तिला निसर्गाबद्दल असलेलं प्रेम, तिचा जात्याच असलेला उत्साह, सतत आनंदी राहणं या तिच्या व्यक्तिमत्त्वाचा फार मोठा प्रभाव जनमानसावर आहे. त्यामुळे ‘सोनी बीबीसी अर्थ’साठी प्रतिनिधी म्हणून तिची निवड योग्य ठरते, असेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.

गर्भवती असतानाही करीनाने काम करणं थांबवलं नव्हतं. आता तर बाळाचा जन्म झाल्यानंतर महिन्या-दोन महिन्यांतच ती पुन्हा कामासाठी सज्ज झाली आहे. सोनम कपूरची निर्मिती असलेल्या ‘वीरे दी वेडिंग’ हा करीनाचा नवीन चित्रपट असणार आहे. याही चित्रपटाचे चित्रीकरण तिने गर्भवती असतानाच पूर्ण केले होते. तिच्याबरोबर सोनम कपूर आणि स्वरा भास्कर यांच्याही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाबरोबर छोटय़ा पडद्यावर ‘सोनी बीबीसी अर्थ’ वाहिनीची प्रतिनिधी म्हणूनही लवकरच ती वेगवेगळ्या भूमिकांमधून दिसणार आहे.