‘उडता पंजाब’ या आगामी चित्रपटाबद्दल सध्या रसिकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटातील अभिनेता शाहीद कपूरचा लूक असलेले पोस्टर प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर आता निर्मात्यांनी अभिनेत्री करिना कपूरचे या चित्रपटातील लूकचे पहिले पोस्टर प्रसिद्ध केले आहे.
या चित्रपटामध्ये करिनाने डॉ. शिवानी गुप्ता ही भूमिका साकारली असून, पोस्टरमध्ये सलवार कमीज घातलेली करिना कपूर बघून आपल्याला ‘जब वी मेट’ या तिच्या गाजलेल्या चित्रपटातील ‘गीत’चीच आठवण येते. चित्रपटात करिना सुरुवातीला शहरांमध्ये डॉक्टर म्हणून कार्यरत असते. पण पंजाबच्या ग्रामीण भागात पसरलेला ड्रग्जचा फैलाव बघून ती ग्रामीण भागात जाऊन काम करण्यास सुरुवात करते, असे दाखवण्यात आले आहे.
अभिषेक चौबे हे या चित्रपटाचे दिग्दर्शक असून, १७ जूनला हा चित्रपट प्रदर्शित होतो आहे. करिनासोबतच या चित्रपटामध्ये शाहीद कपूर, आलिया भट, प्रभज्योत सिंग, पंजाबमधील चित्रपटांचे अभिनेते दिलजीत दोसांझ हे सुद्धा दिसणार आहेत.