बॉलीवूड अभिनेत्री करिना कपूर सध्या गरोदरपणातील दिवसांचा आनंद लुटत आहे. पती सैफ अली खान आणि मित्रमंडळींसोबत जास्तीत जास्त वेळ घालवत असलेली करिना आता सोशल मिडीयावर याबाबतचे काही मजेशीर व्हिडिओ आणि फोटोही शेअर करत असते. नुकतीच करिनाने अधुना बबानीच्या हेअर सलोन बीब्लन्टच्या एका कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. यावेळी माध्यमांनी करिनावर प्रश्नांचा भडीमारच केला.
प्रसिद्ध हेअरस्टाइलिस्ट अधुना बबानी ही सेलिब्रेटींच्या हेअरस्टाइल करण्यासाठी प्रसिद्ध आहे. तिच्या या कार्यक्रमावेळी करिनाला तुला बॉलीवूडमध्ये कोणाचे केस जास्त आवडतात असा प्रश्न करण्यात आला. त्यावर करिनाने थोडा वेळ घेत शाहरुख खान असे उत्तर दिले. त्यानंतर कोणत्या अभिनेत्रीचे केस जास्त आवडतात असा प्रश्न विचारण्यात आल्यावर ब-याचशा अभिनेत्री हेअर एक्सटेन्शनचा वापर करतात. तुम्हाला काय माहित, मला विचारा.. असे तिने खोडकरपणे हसत उत्तर दिले. मुले झाल्यानंतर अभिनेत्रींचे करिअर संपते अशी काहीशी धारणा चित्रपटसृष्टीत आहे. त्यामुळे आता करिनानेही बाळाला जन्म दिल्यावर तिचं करिअर संपणार अशी भीती व्यक्त केली जातेय. त्यातचं गोलमालच्या सिरीजमधील दोन चित्रपटांमध्ये काम करणा-या या अभिनेत्री ऐवजी गोलमाल ४मध्ये आलिया भट दिसणार असल्याचे म्हटले जातेय. पण ‘गोलमाल ४’ मध्ये करिना फक्त एका गाण्यातच झळकणार असल्याचे दिग्दर्शक रोहित शेट्टीने स्पष्ट केले होते. ‘मी करिनाशी संपर्क साधून सहजपणे या चित्रपटातील भूमिकेसाठी तिला विचारले असते आणि तिने त्यासाठी होकारही दिला असता. पण, असे विचारणे मी टाळले (कारण ती गरोदर आहे), त्यामुळे या चित्रपटासाठी एखादे गाणे आम्ही नक्कीच सादर करु’ असे रोहित म्हणाला होता. याबाबत उत्तर देताना करिना म्हणाली की, ‘चित्रपटांतील मला साजेशा भूमिका ज्यांच्याकडे आहेत ते माझ्याकडे येतीलच. मी गरोदर असो वा नसो. यात वावगे काहीच नाही’. त्याला (रोहित शेट्टीला) असे वाटण्याचे कारणच नाही’, असे विधान केले.
‘गोलमाल ४’चे चित्रीकरण जानेवारी महिन्यात सुरु होणार आहे. पुढच्या वर्षीच्या दिवाळीच्या मोसमात ‘गोलमाल ४’ सिनेरसिकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान अभिनेत्री करिना कपूरच्या गरोदरपणाची सध्या प्रचंड चर्चा असली तरीही करिना मात्र चित्रपटसृष्टीतील तिच्या कामाच्या बाबतीत तत्पर आहे असेच दिसत आहे.