कपूर खानदानातील करिश्मा आणि करिना या भगिनी एकमेकांच्या अतिशय जवळ आहेत. मोठ्या बहिणीच्या नात्याने करिश्माने नेहमीच करिनाला मार्गदर्शन केले आहे. गरोदर असलेली करिना जीवनाच्या नव्या टप्प्यावर असून, यावेळीदेखील थोरली बहिण म्हणून करिश्मा तिला योग्य सल्ला देण्याचे काम करत आहे. अनेकजण अनेक सल्ले देतील. परंतु, करिनाने अंतरात्म्याचे ऐकावे असा सल्ला तिने करिनाला दिला आहे. याविषयी बोलताना करिश्मा म्हणाली की, करिनाने प्रत्येकाचा सल्ला ऐकू नये असे माझे तिला सांगणे आहे. गरोदर स्त्रियांना सल्ले देण्यासाठी सर्वांकडे काहीनाकाही असते. स्वानुभवाने आणि मनातील विचारांच्या माध्यमातून शिकणे गरजेचे असल्याचे मला वाटते. लवकरच आई होणाऱ्या आपल्या बहिणीला काही सल्ला दिला का, या प्रश्नाला उत्तर देताना ती बोलत होती. करिश्माने गरोदरपणावर एक पुस्तक लिहिले आहे. ‘माय यमी मम्मी गाइड’ नावाच्या या पुस्तकात गरोदरपणाबरोबरच वजन कमी करण्यापर्यंत लिहिण्यात आले आहे. या पुस्तकात करिश्माने गरोदरपणात परिधान करावयाचे कपडे, मुलांच्या खोलीतील सजावट, मातृत्व आणि आपल्या कामात ताळमेळ कसा बसवावा याविषयी सल्ला दिला आहे. एवढेच नव्हे तर मुलांसाठीच्या स्टायलिश पार्टीचे आयोजन कसे करावे याबाबतदेखील टीप दिली आहे. करिनाला डिलिव्हरीसाठी डिसेंबरमधील तारीख देण्यात आली असल्याचे समजते. करिना कपूर खान आणि सैफ अली खान जोडीचे हे पहिले अपत्य असणार आहे. सध्या बेबीबंपसह नजरेस पडणाऱ्या करिनाने अलिकडेच ‘लॅक्मे फॅशन वीक’मध्ये डिझायनर सव्यसाचीसाठी रॅम्पवॉक केले होते.