सध्या चित्रपट वर्तुळामध्ये ‘बार बार देखो’ या चित्रपटाची बरीच चर्चा आहे. चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी वेगवेगळ्या हटके कल्पनांच्या या दिवसांमध्ये ‘बार बार देखो’ या चित्रपटाच्या नुसत्या गाण्याच्याच प्रसिद्धीने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. ट्विटर आणि यू ट्युबच्या माध्यमातून चित्रपटाच्या टीमने या गाण्याची अत्यंत प्रभावीपणे प्रसिद्धी केली होती. आता सरतेशेवटी हे बहुप्रतिक्षित गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. याबाबतची अधिकृत माहिती करण जोहरसह इतर चित्रपट निर्मात्यांनीही त्यांच्या ट्विटर अकाउंटवरुन शेअर केली.
रॅपर बादशाहने ‘काला चष्मा’ गाण्यास संगीतबद्ध केले असून त्यास अमर आर्शी, बादशाह आणि नेहा कक्कर यांनी गायले आहे. अमर आर्शीच्या १९९० साली प्रदर्शित झालेल्या ‘तेनु काला चष्मा जजता वे’ या सुप्रसिद्ध पंजाबी गाण्याचा हा रिमेक आहे. तर गाण्याची कोरिओग्राफी बॉस्को-सिझर यांनी केली आहे. गेले कित्येक दिवस रुपेरी पडद्यापासून दूर असलेली कतरिना तिच्या आगामी ‘बार बार देखो’ या चित्रपटातील नव्या गाण्याच्या लुकसाठी ट्रेंडमध्ये आली आहे असेच म्हणावे लागेल. करण जोहर, फरहान अख्तर, रितेश सिदवानी, सुनिल लुल्ला यांसारख्या नामवंतांची निर्मिती असणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन नित्या मेहरा करत आहे. ‘बार बार देखो’ या चित्रपटाच्या माध्यमातून नित्या मेहेरा हिंदी चित्रपटसृष्टीत दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहे. रोमॅंटिक ड्रामा असणाऱ्या या चित्रपटात अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कतरिना कैफ महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असल्यामुळे सिनेरसिकांना एका नव्या जोडीची ‘ऑनस्क्रिन केमिस्ट्री’ पाहायला मिळणार आहे.